Viral Video: सध्या सोशल मीडियामुळे (Social Media) कधी कोणता व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होईल काही सांगता येत नाही. पण या व्हायरल व्हिडीओत आपलाही एखादा व्हिडीओ असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यामुळेच आपण काहीतरी हटके करावं यासाठी काहीजण प्रयत्न करत असतात. पण अनेकदा या प्रयत्नांच्या नादात त्यांना मोठी किंमत मोजावी लागते. नुकतंच अशाप्रकारे आपला व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नादात एका तरुणाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक तरुण बैलावर बसवून त्याला पळवत असल्याचं दिसत होतं. रात्रीच्या वेळी रस्त्यावर शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी तपास सुरु केला होता. यानंतर या तरुणाची ओळख पटली आहे. 


आपला व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नादात तरुणाला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागत आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. प्राण्याशी गैरवर्तन केल्याने अनेकांनी नाराजी जाहीर केली होती. पोलिसांनी या तरुणाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, भविष्यात पुन्हा प्राण्यांना अशाप्रकारे इजा पोहोचवली जाऊ नये अशी तंबी दिली असल्याची माहिती दिली आहे. 



या घटनेबद्दल सांगताना पोलिसांनी माहिती दिली आहे की "5 मे रोजी मध्यरात्री सोशल मीडियावर ऋषिकेश येथील तपोवन येथे मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने बैलावर बसून त्याला रस्त्यावर पळवल्याच्या व्हायरल व्हिडीओची आम्ही दखल घेतली आहे. या तरुणाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात पुन्हा अशाप्रकारे प्राण्यांना त्रास देऊ नये अशी समज त्याला देण्यात आली आहे".


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. अशाप्रकारे प्राण्यांशी गैरवर्तन करणं योग्य नसल्याचं मत त्यांनी मांडलं होतं. तर दुसरीकडे काहींनी मात्र या घटनेची तुलना जल्लीकट्टूशी केलो होती. कायदेशीर कारवाई केली जावी असं कोणतंही कृत्य या तरुणाने केलं नसल्याचं मत त्यांनी मांडलं होतं. 


जल्लीकट्टू हा दक्षिणेकडील एक खेळ आहे. यामध्ये बैलाला प्रेक्षकांच्या गर्दीत सोडले जाते आणि प्रत्येकजण बैलाच्या पाठीच्या कुबड्याला दोन्ही हातांनी पकडण्याचा प्रयत्न करतो आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो.