हैदराबादमधील जीडीमेटला इंडस्ट्रियल इस्टेटजवळील वेंकटद्री नगर परिसरात रक्तासारखे लाल रंगाचे द्रव रस्त्यावर वाहून गेल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. एका गटारातून येणारं हे द्रव्य पाहिल्यानंतर रहिवासी घाबरले होते. द्रव्यातून येणारा दुर्गंध आणि श्वास घेताना होणारा त्रास यामुळे या चिंतेत आणखी वाढ झाली होती. लाल रंग असल्याने अनेकांच्या मनात हे रक्त तर नाही ना अशी शंकाही निर्माण झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर काही नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली आहे. यानंतर गळणारे, विषारी द्रव रक्त नसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अधिकाऱ्यांनी हे लाल रंगाचं रसायन जवळच्या औद्योगिक युनिटमधून येत असल्याची माहिती दिली.  सुभाष नगर विभागातील व्यंकटाद्री नगर हे औद्योगिक क्षेत्राला लागून आहे.


परिसरातील काही गोदाम मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही औद्योगिक युनिट्स थेट गटारांमध्ये रसायनं सोडतात. पालिका अधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गटार ओसंडून वाहू लागल्याने लाल रंगाचे द्रव रस्त्यावर आले, त्यामुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली. रासायनिक सांडपाण्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने रहिवासी चिंतेत असून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.


तेलंगणा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या भागाला भेट दिली. उद्योगांद्वारे रसायनांचं विसर्जन रोखण्यासाठी पावलं उचलली जातील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.


दुसऱ्या एका घटनेत लोकांनी मुशी नदीत विषारी रसायन टाकण्याचा प्रयत्न हाणून पाडला. बापूघाट येथे एका ट्रक चालकाने रासायनिक औद्योगिक कचरा मुशी नदीत टाकण्याचा प्रयत्न केला. सायबराबाद आयुक्तालयाच्या राजेंद्रनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. जागरुक रहिवाशांनी चालकाला औद्योगिक कचरा उचलण्यापासून रोखले. पोलिी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तो ट्रक सोडून पळून गेला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 


स्थानिकांच्या म्हणण्यानुसरा, असा प्रयत्न पहिल्यांदाच झाला नव्हता. त्यांच्या म्हणण्यानुसार, नदी आधीपासूनच प्रदूषित असताना काही औद्योगिक युनिट्स नदीत कचरा टाकत आहेत. त्यांनी सरकारला बेकायदेशीर डम्पिंगला आळा घालण्याचं आवाहन केलं आहे. ज्यामुळे नदीचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसते. राज्य सरकार मुशी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टद्वारे नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मोठ्या योजना आखत आहे.