Viral Video: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese Prime Minister  Fumio Kishida) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी फुमियो किशिदा दिल्लीत (Delhi) दाखल झाले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांचं स्वागत केलं. हैदरबाद हाऊसमध्ये (Hyderabad House) दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. दरम्यान सोमवारी फुमियो किशिदा यांनी भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी पाणीपुरीवर चांगलाच ताव मारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागालँडचे मंत्री तेमजेन इमना अलाँग (Temjen Imna Along) यांनीही फुमियो किशिदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फेसबुक अकाऊंटवरही शेअर करण्यात आला होता. 


हा व्हिडीओ शेअर करताना तेमजेन इमना अलाँग यांनी जपानचे पंतप्रधानही पाणीपुरी खाताना आपल्याला रोखू शकत नाहीत असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपलं खाद्यपदार्थांवरील प्रेमही व्यक्त केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओलाही 6500 हून अधिक जणांनी पाहिलं आहे. 



"खाण्यासंबंधीच्या पोस्टवर मी कमेंट करण्यापासून कसं काय स्वत:ला रोखू शकतो. मला एक सुका पुरी दे मित्रा! गोलगप्पे खाण्यापासून जपानचे पंतप्रधानही स्वत:ला रोखू शकत नाही आहेत. गुरुजींची स्टाइलच वेगळी आहे," असं तेमजेन इमना अलाँग पोस्ट शेअर करताना म्हणाले आहेत. 


भारतामध्ये रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये पाणीपुरी चांगलीच प्रसिद्ध आहे. प्रत्येक शहरात याला वेगवेगळ्या नावाने संबोधित केलं जातं. जपानच्या पंतप्रधानांनी पाणीपुरीसह, आम पन्ना आणि लस्सीचाही आनंद घेतला. दिल्लीमध्ये बुद्ध जयंती पार्कला भेट दिली असता त्यांनी या सर्व पदार्थांवर ताव मारला. 


जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सोमवारी सकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी दाखल झाले. हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही पंतप्रधानांमध्ये बैठक पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिरोशिमा येथे मे महिन्यात होणाऱ्या जी7 नेत्यांच्या बैठकीचं निमंत्रण दिलं.