Viral Video: सध्या तंत्रज्ञानाचं युग असून, प्रत्येकाला बसल्या जागेवर सर्व सुविधा मिळवण्याची सवयच लागली आहे. कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर होम डिलिव्हरी होत आहे. त्यातही खाण्याच्या गोष्टींना जास्त मागणी असल्याने या क्षेत्रात रोज नवनव्या कंपन्या येत आहेत. पण एकीकडे याचे फायदे असताना, ग्राहकांना काही तोटेही सहन करावे लागत आहेत. अनेकदा फूड डिलिव्हरी एजंट्स गैरफायदा घेत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली असून फूड डिलिव्हरी एंजट ग्राहकाशी बेशिस्तपणे वागला आहे. इतकंच नाही तर ग्राहकाने ऑर्डर केलेलं अन्न आरामशीर बसून खात होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमन बीरेंद्र जयस्वाल नावाच्या ग्राहकाने 'ओला फूड्स'च्या डिलिव्हरी एजंटचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरुन संताप व्यक्त होत आहे. अमन यांनी इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर केला असून, यामध्ये एजंट त्यांनीच ऑर्डर केलेले फ्रेंच फ्राइज बाईकवर बसून खात असल्याचं दिसत आहे. यानंतर युजर्स संताप व्यक्त करत असून कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मुलभूत प्रशिक्षण तरी देतात की नाही? अशी विचारणा करत आहेत. 


व्हिडीओत दिसत आहे की, अमन बाईकच्या दिशेने चालत जातात जिथे डिलिव्हरी बॉय बसला आहे. त्यावर डिलिव्हरी बॉय त्यांना 'काय आहे?' अशी विचारणा करतो. त्यावर अमन म्हणतात की, 'तू जे खात आहेस ते माझे फ्रेंच फ्राइज आहेत'. त्यावर डिलिव्हरी बॉय त्यांना उद्धटपणे 'हा तुम्हाला जे करायचं ते करा' असं म्हणतो. त्यावर अमन विचारतात, 'ऑर्डर आणून देणार नाही का? ही माझी ऑर्डर आहे'. त्यावर एजंट म्हणतो, 'मग मी काय करु?'. नंतर अमन, 'मग आणून का दिली नाही?' अशी विचारणा करतात. 



व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अमन यांनी ओला कॅबला टॅग केलं असून संताप व्यक्त केला आहे. 'तुमचे डिलिव्हरी पार्टनर अशा गोष्टी करत आहेत. आधी त्याने मला ऑर्डर आणण्यासाठी अतिरिक्त 10 रुपये द्यावे लागतील असं सांगितलं. आधी मी नकार दिला आणि मग म्हणालो  ठीक आहे. यानंतर तो 45 मिनिटांनी आला आणि आता मी त्याला इथे माझी ऑर्डर खाताना पाहिले. तो काय म्हणतोय ते ऐका".


ऑनलाइन पोस्ट केल्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 2 मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे. यावर अनेक कमेंट्सही केल्या जात असून, आपले अनुभव शेअर करत आहेत.