माशी अन्नावर बसते तेव्हा नेमकं काय होतं? पाहा कधीही न पाहिलेला VIDEO
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका माशी जेव्हा अन्नावर बसते तेव्हा नेमकं काय होतं हे दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आपण घरी किंवा बाहेर जेवताना अनेकदा आजुबाजूला माशा घोंघावताना दिसतात. बाहेर स्टॉलवर तर अनेकदा या माशा खाद्यापर्थांवर बसलेल्या असतात. पण जेव्हा माशी अन्नावर बसते तेव्हा नेमकं काय होतं? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? अनेकांना याचं उत्तर माहिती नाही. नेमका याचाच उलगडा एका व्यक्तीने केला असून, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये जेव्हा एखादी माशी अन्नावर बसते तेव्हा नेमकं काय होतं हे सविस्तरपणे दाखवण्यात आलं आहे.
जॅक डी फिल्म्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ग्राफिक्सच्या आधारे हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. यात सांगण्यात आलं आहे की, माशी अन्नावर बसल्यानंतर त्या थेट खाण्यास सुरुवात करत नाहीत. माशी माणसाप्रमाणे चावून अन्न खात नाही. तर त्या अन्नावर एका विशिष्ट प्रकारीच लाळ टाकतात.
पुढे सांगण्यात आलं आहे की, या लाळेत डायजेस्टिव्ह एंजाइम असतात, जे तुमच्या अन्नाचा तो भाग द्रवात रुपांतरित करतात. यानंतर माशी एखाद्या ज्यूसप्रमाणे पिण्यासाठी आपल्या सोंडेचा वापर करतात. अशाच प्रकारे त्या आपलं अन्न खातात.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना पहिल्यांदाच ही गोष्ट समजली आहे. यामुळे हजारो युजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, 'अरे हे मी काय पाहिलं'. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, 'लक्षात ठेवा की या माशा दिवसभर कचऱ्यावर बसलेल्या असतात. यानंतर त्या ती घाण तुमच्या अन्नावर टाकतात. त्याच्या पायाला लागलेली घाणही त्या अन्नावर सोडतात. यामुळे मी माशा बसलेलं अन्न खात नाही'.
अनेकांना माशी नेमकं कशाप्रकारे अन्न खाते हे माहिती नाही पाहून मला आश्चर्य वाटलं असं एक युजर म्हणाला आहे. कमेंट करणाऱ्या अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
डॉक्टर कॅमरुन वेबने सिडनी युनिव्हर्सिटीसाठी एक लेख लिहून माशा अशाच प्रकारे अन्नाचं सेवन करत असल्याला दुजोरा दिला आहे. लोकांनी अन्नावर बसलेल्या माशा हाकलाव्यात का किंवा ते अन्न फेकून द्यावं का या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली होती.