Delhi Metro : देशात रेल्वे अपघाताच्या घटना सातत्याने घडता दिसत आहेत. मात्र आता मेट्रोतही अपघाताच्या घटना घडत आहे. दिल्ली मेट्रोतील अपघताचा एक हादरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण ट्रेन आणि ट्रॅकमध्ये अडकलेला दिसत आहे. आजूबाजूचे कर्मचारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ज्या पद्धतीने हा तरुण अडकला त्यावर तो जबर जखमी झाल्याची शक्यता आहे. बुधवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसा घडला अपघात?


हा व्हिडिओ 12 नोव्हेंबरचा असल्याची म्हटलं जात आहे. मेट्रो स्टेशनवर एक प्रवासी रुळावर खाली उतरून चुकीच्या मार्गाने एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याचदरम्यान मेट्रो आल्याने तो ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मवर आलेल्या ट्रेनमध्ये अडकला. ट्रेन चालकाने तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. बऱ्याच प्रयत्नानंतर त्या व्यक्तीला तेथून बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले.


दिल्ली मेट्रोने दिली माहिती


दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या घटनेबाबत माहिती दिली आहे. या घटनेची चौकशी करताना नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले आहे, असे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने म्हटलं आहे. दिल्ली मेट्रोचे डीसीपी राम गोपाल नाईक यांनीही हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत मला प्रसारमाध्यमांकडून या घटनेशी संबंधित अनेक फोन आले आहेत. या व्हिडिओशी संबंधित कोणत्याही घटनेबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. ही खूप जुनी घटना असू शकते किंवा इतर कुठेतरी घडलेली असू शकते. पण गेल्या काही दिवसांत दिल्लीत अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असे  राम गोपाल नाईक यांनी सांगितले.


 



प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर राम गोपाल नाईक यांनी लोकांना प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मेट्रो असो की रेल्वे स्टेशन रेल्वे ट्रॅक किंवा मेट्रो ट्रॅकवर उतरताना कोणतीही चूक करू नये. कारण याकडे दुर्लक्ष केले की अपघात वाढतील, असे राम गोपाल नाईक म्हणाले.


वेळ संपल्याचे सांगून लोको पायलटने थांबवली ट्रेन


दरम्यान, सहरसाहून दिल्लीला जाणारी विशेष ट्रेन बुरवाल रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली होती. मालगाडी ओलांडल्यानंतर प्रवासी गाडी सुरू होण्याची वाट पाहत बसले. तासाभरानंतर प्रवाशांनी चौकशी सुरू केली असता चालक आणि गार्डची कामाची वेळ संपल्याने ते निघून गेल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे 2500 प्रवासी रेल्वे स्थानकावर अडकून पडले होते. प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक पाहून वरिष्ठ अधिकार्‍यांना याची माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी तात्काळ गोंडा येथून चालक आणि गार्डला पाठवले. बऱ्याच वेळानंतर ट्रेन सुटल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.