मुलाला स्कुटीवरुन शाळेत सोडणं पडलं महाग, भटके कुत्रे लागले मागे... भयानक अपघाताचा Video व्हायरल
शहर असो वा ग्रामीण भाग देशात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत चालली आहे. रस्त्यारस्त्यावर, गल्लोगल्ली कुत्र्यांची टोळकी तयार झाली असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
Stray Dog Attack : देशातील अनेक शहरात भटक्या कुत्र्यांची (Stray Dogs) समस्या गंभीर होत चालली आहे. शहराचा वाढता विस्तार, कुठेही टाकला जाणारा कचरा यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या निर्माण झाली आहे. तलहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कुत्र्याने हल्ला (Dog Attack) केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विशेषता रात्रीच्या वेळी या परिसरातून जाणाऱ्या पादचारी, वाहनचालकांच्या मागे ही कुत्री धावतात. परिणामी, अपघाताला निमंत्रण मिळते. अशाच एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ
ओडिशातल्या बेरहामपूर (Odisha Berhampur) शहरातील अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला स्कूटीवर आपल्या मुलाला शाळेत सोडण्यास जात असताना तिच्या स्कूटीमागे चार ते पाच भटके कुत्रे लागले. त्यामुळे घाबरलेल्या त्या महिलेने स्कुटीचा वेग वाढवला. पण स्कुटीवरचं नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या एका कारवर तिची स्कुटी धडकली आणि लहान मुलासह महिलाही रस्त्यावर कोसळली.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काय?
अवघ्या दहा ते बारा सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत एक महिला स्कुटी चालवताना दिसत आहे. स्कुटीवर पुढे शाळेतला एक मुलगा असून मागेदेखील एक महिला बसलेली दिसत आहे. एका निर्जन रस्त्यावरुन जाताना या महिलेच्या स्कुटीच्या मागे भटके कुत्रे लागतात. त्यामुळे ती महिला प्रचंड घाबरलेली दिसत आहे. कुत्र्यांच्या भीतीने ती महिला स्कुटीचा वेग वाढवते, पण स्कुटीवरचं नियंत्रण सुटल्याने तिची स्कुटी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळते. यात स्कुटीवर बसलेले तिघंही उंच उडून रस्त्यावर आदळतात.
दोन महिला गंभरी जखमी
भीषण अपघाताचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघाता जखमी झालेल्या महिलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भटक्या कुत्र्यांची समस्या
देशातील जवळपास प्रत्येक शहर आणि ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत आहे. रस्त्यारस्त्यावर, गल्लोगल्ली कुत्र्यांची टोळकी तयार झाली आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पहाटे कामावर जाणाऱ्या किंवा रात्री उशिरा कामावरुन घरी पतणाऱ्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास दुचाकीस्वारांना होतो. धावत्या दुचाकीच्यामागे भटके कुत्रे लागत असल्याने अनेक अपघात घडतात.
गेल्या काही दिवसात लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. हैदराबादमध्ये एका लहान मुलावर पाच ते सहा कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या हल्ल्यात कुत्र्यांनी लहान मुलाचे अक्षरश लचके तोडले. यात लहान मुलाचा मृत्यू झाला.