Varanasi court Order Gyanvapi Mosque Signboard: उत्तर प्रदेशमधील वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणामध्ये बुधवारी मोठा निर्णय देत मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का दिला. सर्वेक्षणाच्या अहवालानंतर न्यायालयाने हिंदू पक्षाला ज्ञानवापी मशिदीच्या परिसरामध्ये असेलल्या व्यासजीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयानंतर गौदोलिया चौकामध्ये स्थानिक प्रशासनाने लावलेल्या दिशादर्शक फलकावर लिहिण्यात आलेल्या 'ज्ञानवापी मशीद' या नावाशी छेडछाड करण्यात आली आहे. नावातील मशीद या अक्षरांवर मंदिर असा स्टीकर चिटकवण्यात आला आहे. बोर्डावरील हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेला मशीद असा उल्लेख मंदिर लिहिलेल्या स्टीकरने झाकून टाकण्यात आला. या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाराणसीमधील राष्ट्रीय हिंदू दलाने 2 दिवसांपूर्वीच गोदौलिया चौकात लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर लिहिलेल्या 'ज्ञानवापी मशीद' या नमोल्लेखावर आक्षेप नोंदवला होता. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पर्यटन निर्देशालयाला पत्र पाठवून या फलकावरील ज्ञानवापी नावापुढील मशीद हा उल्लेख काढावा अशी मागणी केली होती. ज्ञानवापी मशिदीच्या परिसरामध्ये असेलल्या व्यासजीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी दिल्यानंतर हिंदू संघटनेचे कार्यकर्ते फारच उत्साहामध्ये दिसले. कोर्टाचा आदेश आल्यानंतर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या फलकावरील मशीद शब्दावर मंदिर लिहिलेला स्टीकर चिटकवला. 


...म्हणून काढलं नाव


हिंदू संघटनेच्या या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, काशी विश्वनाथला येणाऱ्या भक्तांचा या फलकामुळे संभ्रम होतो. मशीद या शब्दामुळे काशी विश्वनाथला येणारे भक्त गोंधळून जातात. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर गोदौलिया चौकात ज्ञानवापी मशीद असा उल्लेख असलेला साईन बोर्ड लावणं हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतात. ज्ञानवापी प्रकरणामध्ये जोपर्यंत कोर्टाचा निर्णय घेत नाही तोपर्यंत या फलकावर केवळ ज्ञानवापी असा उल्लेख करावा, अशी आमची मागणी असल्याचंही या कार्यकर्त्यांनी सांगितलं.



निकालानंतर 24 तासांच्या आत झाली पुजा


वाराणीसमधील ज्ञानवापी मशीद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असलेल्या तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार दिला जावा अशी मागणी शैलेंद्र कुमार पाठक यांनी याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर काल कोर्टाने दोन्ही बाजून ऐकून घेतल्यानंतर जिल्हा न्यायालयाने निकाल सुरक्षित ठेवला होता. यावर आज निकाल सुनावताना हिंदू पक्षाला दिलासा देण्यात आला. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी 7 दिवसांमध्ये पूजा सुरु होईल. या पुजेला सर्वांना जाता येईल, अशी माहिती दिली होती. मात्र काल निकाल आल्यानंतर रात्रीच या ठिकाणी पूजा करण्यात आली.



आता प्रकरण वरिष्ठ कोर्टात जाणार


मुस्लीम पक्षाने प्लेसेस ऑफ वर्कशीप अॅक्टचा संदर्भ देताना हिंदू पक्षाची याचिका रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळू लावताना हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या तळघरामध्ये हिंदू पक्षाला पूजा करण्याची परवानगी दिली आहे. मुस्लीम पक्ष या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं मुस्लीम पक्षाच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली जाणार आहे. मुस्लीम पक्ष म्हणजेच अंजुमन इंतजामिया मसाजिद कमिटीचे वकील अखलाक अहमद यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. आधीच्या आदेशांना डावलून हा आदेश देण्यात आला आहे. याविरोधात आम्ही वरिष्ठ कोर्टात जाणार आहोत, असं अहमद म्हणाले.