रिल बनवण्यासाठी सर्व हद्द पार! एका हातात लहान बाळ, दुसऱ्या हातात सिगरेट आणि... Video पाहून युजर्स संतापले
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रील बनवण्यासाठी एका महिलने सर्व हद्द पार केलीय. या महिला अटक करावी अशी मागणी आता युजर्स करतायत.
Viral Video : सोशल मीडियावर रिल (Reels) बनवण्यासाठी लोकं कोणतीही पातळी गाठतात. लाईक आणि कमेंटसाठी स्वत:बरोबरच दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालण्यासही हे मागेपुढे पाहात नाहीत. अनेक घटनांमध्ये हे रिल जीवावरही बेतला आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रील बनवण्यासाठी एका महिलने सर्व हद्द पार केलीय. या महिला अटक करावी अशी मागणी आता युजर्स करतायत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक महिलेच्या एका हातात लहान बाळ दिसत असून दुसऱ्या हातात तीने सिगरेट पकडली आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक महिला दिसत असून तीने उजव्या हातात लहान बाळ पकडलं आहे. तर तिच्या दुसऱ्या हातात पेटती सिगरेट आहे. सिगरेटचा झुरका ( Cigarette Smoke) मारल्यानंतर ती मुलासमोरच तोंडातून धूर सोडते. या व्हिडिओच्या बॅकराऊंडला एक हिंदी गाणंही लावण्यात आलं आहे. या गाण्यावर ती महिला रिल बनवतेय.
कोण आहे ती महिला
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या संतापचा कडेलोट झाला आहे. युजर्सने हे गुन्हेगारी कृत्य मानून कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडिओ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी शेअर केला आहे. महिलेच्या हातात जे मूल आहे ते त्या महिलेचं नाही असं दीपिका भारद्वाज यांनी म्हटलंय. यासाठी दीपिका भारद्वाज रिल बनवणाऱ्या महिलेच्या पेजवर गेल्या. तिच्या इतर कोणत्याही व्हिडिओत ते बाळ दिसलं नाही. धक्कादायक म्हणजे या महिलेचे सर्व व्हिडिओ हे सिगरेट पितानाचे आहेत.
व्हिडिओ पाहून युजर्स संतापले
एका युजर्सने म्हटलंय की या महिलेचं कुटुंब कुठे आहे आणि ते हस्तक्षेप का करत नाहीत? यावर दीपिका भारद्वाज यांनी उत्तर दिलंय. रिल बनवणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांनी बहुदा डोळे बंद करुन ठेवलेत. मुलगी घरी पैसे आणते, मग ते कसेही आणोत.
व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या एक युजरने हे कुठेतरी थांबायला हवं असं म्हटलं आहे. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे त्या लहान बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्या मुलाला श्वसनासंबंधी आजार होऊ शकतात. कानात संक्रमण होऊ शकतं, इतकंच नाही तर सिगरेटच्या धुरामुळे लहान बाळाच्या मेंदूचा विकासही खूंटू शकतो, असं डॉक्टरने म्हटलंय. सिगरेटचा धूर लहान मुलांसाठी विषारी धुरासारखा आहे. जर तूम्ही धुम्रपान करत असलात तर लहान मुलांपासून दूर राहा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.