नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला चौकीदार म्हणून संबोधले आहे. त्यानंतर भाजपने 'मै भी चौकीदार’ अशी मोहीमे राबविण्यास सुरुवात केली. या मोहिमेची सोशल मीडियावर खिल्ली उडविण्यात येत आहे. काँग्रेसने चौकीदार चोर आहे, असा नारा लगावलाय. तर पाटीदार नेते हार्दीक पटेल यांनी 'मी बेरोजगार' असे प्रत्युत्तर दिले आहे. आता तर आम आदमी पार्टीने थेट मतदारांना आवाहन केले आहे, ‘तुमची मुले चौकीदार व्हावीत, असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा.' आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मोदी यांनी सुरुवात केलेल्या भाजपाच्या ‘मै भी चौकीदार’ मोहिमेवर टीका केली आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील म्हणून तुमची मुले नको व्हावीत असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला तुमची मुले चौकीदार व्हावीत असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा, असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘नरेंद्र मोदींची संपूर्ण देश चौकीदार व्हावा, अशी इच्छा आहे. पण जर तुम्हाला तुमच्या मुलांना चांगले उच्च शिक्षण द्यायचे असेल आणि त्यांनी डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हावे असे वाटत असेल तर आम आदमी पक्षाच्या प्रामाणिक आणि शिक्षित उमेदवारांना मतदान करा’, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. मोदी यांनी अनेक सभांमध्ये चौकीदार म्हणून स्वत:चा उल्लेख केला होता. सोशल मीडियावर त्यांनी मोहिमदेखील सुरु केली आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नावाआधी ‘चौकीदार’ असं लिहित नवी मोहिम सुरु केली.


मोदींचा हा कित्ता भाजपचे नेते आणि मंत्र्यांनी गिरविण्यास सुरुवात केली आहे. तर काही मंत्र्यांनी हा आपल्या नावापुढे चौकीदार लिहिले. मात्र, त्यानंतर ट्रोल झाल्यानंतर चौकीदार हा शब्द हटवला आहे. भाजपाच्या या मोहिमेवर ‘चौकीदार चोर है’ अशी टीका काँग्रेसने केली आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे.