नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपन्या येणाऱ्या फेस्टिव्ह सीजनमध्ये, देशातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. अमेझॉन (Amazon)आणि ई-कॉम एक्सप्रेसनंतर (E-comm Express) आता वॉलमार्टच्या  (Walmart) मालकीची असलेल्या फ्लिपकार्टनेही (Flipkart) याबाबत घोषणा केली आहे. कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशात फेस्टिव्ह सीजनच्या आधी लोकांना तात्पुरते रोजगार मिळाण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

70 हजार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता


फ्लिपकार्टने सांगितलं की, फेस्टिव्ह सीजनआधी आणि बिग बिलियन डेज विक्री दरम्यान देशात 70 हजार लोकांना सणासुदीच्या काळात प्रत्यक्ष रोजगार आणि लाखो लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहेत. बंगळुरु स्थित कंपनीने सांगितलं की, फ्लिपकार्टची संपूर्ण पुरवठा साखळी थेट रोजगाराच्या संधी निर्माण करेल. तर किरकोळ दुकानं आणि विक्री भागीदार केंद्र अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करतील.


या लोकांना रोजगाराची संधी 


सणासुदीच्या काळात विक्रीच्या ठिकाणांपासून मालवाहतूकदारांपर्यंतच्या सर्व सहाय्यक उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी तयार होतील, असं कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे. सणांच्या काळात व्यवसायाचा एक मोठा भाग ई-कॉमर्स कंपन्यांच्या खात्यात जातो आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी, त्यांची क्षमता वाढवण्यासाठी ते अधिक गुंतवणूक करतात.


गेल्या वर्षी फ्लिपकार्ट आणि अमेझॉनने सणांच्या काळात, विक्रीदरम्यान 1.4 लाखांहून अधिक तात्पुरत्या रोजगार निर्मितीची घोषणा केली होती. 


सणांच्या काळात विक्रीदरम्यान साठवण, पॅकेजिंग, मानव संसाधन, प्रशिक्षण आणि वितरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, जी उत्सवाच्या काळात अतिरिक्त रोजगार निर्मितीस मदत करत असल्याचं, फ्लिपकार्टने सांगितलं.