नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने दररोज अयोध्या खटल्याची सुनावणी घेतल्यास अवघ्या १० दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागेल, असा दावा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. ते बुधवारी एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी ठामपणे राम मंदिराच्या मागणीचे समर्थन केले. अयोध्येत राम मंदिर 'त्याच' जागेवर उभारले पाहिजे, ही आमच्या पक्षाची मागणी आहे. तसेच न्यायालयाने हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढले पाहिजे. जानेवारीत सर्वोच्च न्यायालयाची या प्रकरणाची सुनावणी होईल. त्यानंतर दररोज सुनावणी झाली तर १० दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागेल. केवळ भाजपलाच नव्हे तर संपूर्ण देशाला अयोध्येत भव्य राम मंदिर हवे आहे, असे शहा यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत मंगळवारी झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीतही अनेक खासदारांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. सरकार राम मंदिरासाठी अध्यादेश कधी काढणार, असा सवाल खासदार हरी नारायण राजभर यांनी विचारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंपने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशातील वातावरण तापले आहे. 


या मुद्द्यावरून शिवसेनेच मुखपत्र असलेल्या 'सामना'तून मोदी सरकारवर नुकतीच टीकाही करण्यात आली. राम मंदिर हा आता चर्चा, चिंतन आणि संयमाचा विषय राहिला नसून ‘ऍक्शन’ म्हणजे कृतीचा विषय बनला आहे. मात्र, राजनाथ सिंग म्हणतात, ‘संयम राखा’ व गडकरी सांगतात ‘सहमतीने मंदिर बांधा.’ याच संयम आणि सहमतीच्या चिपळय़ा वाजवत बसले असते तर पंचवीस वर्षांपूर्वी अयोध्येत बाबरीचा कलंक नष्ट झाला नसता. तेव्हा ‘मंदिर वहीं बनाएंगे’ची भाषा होती व आता संयम, सहमतीची भाषा आहे. पंचवीस वर्षे राम उघडय़ा तंबूत व आपण सारे सत्तेच्या खुर्च्या उबवत आहोत. राममंदिरावर अध्यादेश काढणे राहिले बाजूला, ज्यांनी मंदिरासाठी बाबरी पाडली त्यांच्यावरचे खटलेही तुम्ही काढू शकत नाही, अशा तिखट शब्दांत शिवसेनेने मोदी सरकारला लक्ष्य केले.