सुकमा: तुम्हाला राजकारणी व्हायचे असेल तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची कॉलर पकडायला शिका, असा सल्ला छत्तीसगढचे मंत्री कवासी लखमा यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षकदिनानिमित्त सुकमा जिल्ह्यातील एका शाळेला कवासी लखमा यांनी भेट दिली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना राजकारणाचे धडे देताना कवासी लखमा यांची मुक्ताफळे उधळली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रसंगाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कवासी लखमा यांनी म्हटले आहे की, मोठा नेता व्हायचे असेल तर कलेक्टर आणि एसपी (पोलीस अधीक्षक) यांची कॉलर पकडायला शिका. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 


पाचवेळा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आलेले कवासी लखमा यापूर्वीही अशाच वादात सापडले होते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी कणकेर जिल्ह्यातील मतदारांना काँग्रेसविरोधात मतदान केल्यास वीजेचा शॉक देण्याची धमकी त्यांनी दिली होती. यावरून बराच गदारोळ निर्माण झाला होता. 


२०१३ मध्ये नक्षलवादी हल्ल्यात छत्तीसगढ काँग्रेसमधील अनेक नेते मारले गेले होते. मात्र, कवासी लखमा या हल्ल्यातून बचावले होते. त्यामुळे या हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोपही झाला होता. मात्र, राष्ट्रीय तपासयंत्रणेने चौकशीअंती त्यांना क्लीन चीट दिली होती. 


दरम्यान, याप्रकरणी लखमा यांनी सारवासारव करताना माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. मी अनेकदा शाळा, आश्रमशाळांना भेटी देतो आणि तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षांबद्दल प्रश्न विचारतो. एका विद्यार्थ्याने नेता होण्यासाठी काय करावे लागते, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी नेता होण्यासाठी अभ्यास करायला हवा, लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रस्त्यावर उतरायला हवे, प्रचंड मेहनत घ्यायला हवी, असे सांगितल्याचा दावा कवासी लखमा यांनी सांगितले.