बागपत: भारतातून पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या तीन नद्यांचे पाणी लवकरच सरकारकडून तोडण्यात येणार आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी यासंदर्भात भाष्य केले. ते गुरुवारी उत्तर प्रदेशमधील एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, १९६० सालच्या सिंधू पाणीवाटप करारानुसार दोन्ही देशांमध्ये सामियाक असलेल्या सहा नद्यांपैकी रावी, बियास आणि सतलज तीन नद्यांवर भारताचा हक्क आहे. तर झेलम, चिनाब आणि सिंधू या नद्यांवर पाकिस्तानचा हक्क आहे. या हक्काचा फायदा उठवत भारताकडून लवकरच तीन नद्यांचे पाणी यमुनेच्या दिशेने वळवण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी दहशतवाद्याने घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.




या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक, आर्थिक आणि व्यापारी अशा सर्व स्तरांवर पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता भारताकडून पाकचे पाणी तोडण्यात येणार आहे. त्यासाठी या तिन्ही नद्यांवर धरणे  उभारण्यात येत आहेत. या माध्यमातून हे संपूर्ण पाणी यमुना नदीत वळवले जाईल. त्यामुळे यमुनेत पाण्याचा मोठा साठा उपलब्ध होईल, असे गडकरी यांनी सांगितले. याशिवाय, या पाण्यामुळे हरियाणातली जलसंकट मिटू शकते. शक्य झाल्यास हे पाणी राजस्थानपर्यंत नेण्याचाही सरकारचा मानस आहे.