मोदींनी पराभव केला मान्य, काँग्रेसला दिल्या शुभेच्छा
पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलेय, जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारलाय.
नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलेय, जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारलाय. छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील लोकांनी या राज्यांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. या राज्यातील भाजपच्या सर्व सरकाऱ्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अथक काम केले, असे मोदी म्हणालेत.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया ट्विट केली. जनतेनं दिलेला कौल मान्य आहे. दरम्यान, तीन राज्यांत विजय मिळवणाऱ्या काँग्रेसचे पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र शेवटपर्यंत चुरशीचे राहिले. मात्र, या ठिकाणी सर्वाधिक जागा काँग्रेसने पटकावल्यात. बहुमत मिळेल किंवा नाही, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नाही. तर भाजपच्या हातून सत्ता निसटल्याचं जवळजवळ स्पष्ट झालं आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली असून, काँग्रेसनं तिथं जोरदार मुसंडी मारली आहे. तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीला जनतेनं कौल दिला आहे. तर मिझोराममध्ये काँग्रेसला मोठा हादरा बसला. मिझो नॅशनल फ्रंटनं बहुमत मिळवलं आहे.
तेलंगणामध्ये विजय मिळवल्याबद्दल मोदींनी के. चंद्रशेखर राव यांचेही अभिनंदन केले. मिझोराममध्ये बहुमत मिळवलेल्या मिझो नॅशनल फ्रंटचंही त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले. राज्यांतील निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र काम केलं. त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांना सलाम करतो, असं ते म्हणाले.