महिलांवर मुलांची जबाबदारी असते, युद्धभूमीवर पाठवता येणार नाही- लष्करप्रमुख
लष्करप्रमुखांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता
नवी दिल्ली: महिलांवर लहान मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी असल्यामुळे त्या अजूनही युद्धभूमीवर जायला तयार नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले. ते 'न्यूज १८' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काही ठिकाणी महिलांना कपडे बदलताना अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत त्या पुरुष सहकाऱ्यांवर छेडछाडीचा आरोप करू शकतात. भविष्यात आपण महिलांना युद्धभूमीवर पाठवू शकतो. मात्र, तुर्तास ते शक्य नाही. कारण लष्करातील अनेक जवान हे ग्रामीण भागातून आलेले असतात. त्यामुळे ते महिला अधिकाऱ्यांचे नेतृत्व स्वीकारणार नाहीत, असे रावत यांनी म्हटले.
याशिवाय, महिलांच्या प्रसुती रजेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण युद्धभूमीवर असताना किमान सहा महिने तुम्ही युनिट सोडून जाऊ शकत नाही. अशावेळी महिलांना रजा नाकारली तरी मोठे वाद निर्माण होतील, असेही रावत यांनी सांगितले. लष्करप्रमुखांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वादाला सुरुवातही झाली आहे. अनेकांनी या वक्तव्यावरून लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यावर टीका केली.
भारतीय लष्करात सध्या ३,७०० महिला लघू सेवा आयोगावर (शॉर्ट सर्व्हिस कमिशन ) कार्यरत आहेत. जगातील इतर देशांमध्ये लष्करातील महिलांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, भारतीय लष्कराने अजूनही पायदळ किंवा चिलखती दलात (आर्मर्ड कोअर) महिलांना स्थान दिलेले नाही. युद्धाशी प्रत्यक्ष संबंध नसणाऱ्या पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अभियंता, सागरी टेहाळणी विमानाचे पर्यवेक्षक आणि सामरिक ऑपरेटर यासारख्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. यापूर्वी भारतीय नौदलाचे एडमिरल यांनी युद्धनौकांवर महिलांना भरती करण्याच्यादृष्टीने चाचपणी सुरु केली होती.