नवी दिल्ली: भारताला कोणाच्याही वाट्याचा भूप्रदेश हिसकावयाचा नाही. आम्हाला केवळ शांतता हवी, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते रविवारी भाजपच्या जनसंवाद रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या लडाखमध्ये चीनसोबत सुरु असलेल्या सीमावादावर भाष्य केले. गडकरी यांनी म्हटले की, आपल्या एका बाजूला पाकिस्तान आहे तर दुसऱ्या बाजूला चीन आहे. आपल्याला शांतता आणि अहिंसेची अपेक्षा आहे. भारताने कधीही भूतान किंवा बांगलादेशचा भूभाग बळकावयाचा प्रयत्न केला नाही. आपल्याला चीन किंवा पाकिस्तानचा भूभाग नको आहे. केवळ शांतता हवी आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. मध्यंतरी हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैनाधिकाऱ्यांमध्ये चर्चाही झाली होती. मात्र, अद्याप या वादावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे भारत-चीन सीमाप्रश्न सध्या धुमसत आहे. मात्र, भारताने हा प्रश्न सामोपचारानेच सोडवायचा, अशी भूमिका वारंवार जाहीर केली आहे. 



दरम्यान, आजच्या जनसंवाद रॅलीत नितीन गडकरी यांनी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भातही भाष्य केले. कोरोनाची साथ दीर्घकाळ राहणार नाही. भारत आणि इतर देशातील वैज्ञानिक कोरोनावर लस विकसित करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यांना लवकरच यश मिळेल, अशी आशा आपल्याला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.