या ६ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
मध्य प्रदेशच्या दक्षिण पश्चिम भागात आणि सीमावर्ती गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने या राज्यांत मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.
मुंबई : हवामान खात्याने मध्य प्रदेश आणि गोवासह सहा राज्यांतील काही भागामध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. शुक्रवारी विभागाच्या प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील दक्षिण पश्चिम भागात आणि गुजरात आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा क्षेत्रामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
यामुळे उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकमधील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थानातील नैऋत्य भागात आणि मध्य प्रदेशच्या नैऋत्य भागात अनेक ठिकाणी पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
केरळात धोक्याचा इशारा
केरळमध्ये पावसाचा प्रकोप झाल्याने आतापर्यंत ३०० पेक्षा लोकांचे बळी गेलेत. अनेक ठिकाणी २० फुटांपेक्षा जास्त पुराचे पाणी अनेक गावांत आणि शहरात आहे. केरळच्या देवभूमीत सध्या मृत्यूचं तांडव सुरु आहे. देवभूमी केरळवर सध्या वरूणराजा कोपलाय. गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं तिथं जलप्रलय आलाय. या पावसानं आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिकांचे बळी घेतलेत. पथनमातित्ता, एर्नाकुलम आणि थरीस्सून जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याची पातळी २० फुटांहून अधिक आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्यात. पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या पाच टीम दाखल झाल्यात. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम बचावकार्य करणाऱ्या पथकानं सुरू केलंय..