मुंबई - तुमची उपस्थिती हाच आहेर अशा स्वरुपाचे वाक्य आपण लग्नाच्या पत्रिकेत कायम बघतो. अलीकडे लग्न करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न केल्याची उदाहरणेही तुम्ही ऐकली असतील. पण लग्नाच्या पत्रिकेमध्ये एखाद्या नेत्याला मतदान करण्याचे आवाहन करण्याचे तुम्ही कधी ऐकले नसेल. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याची वातावरण निर्मिती आतापासूनच सुरू झाली आहे. वेगवेगळ्या बैठका, कार्यक्रम यांना सुरुवात झाली आहे. अशातच एका वराने त्याच्या लग्नपत्रिकेत चक्क 'नरेंद्र मोदींना मतदान हाच आमच्यासाठी आहेर' असे वाक्य लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. वर कुटुंबीय गुजरातमधील सूरतचे राहणार आहेत. वराचे नाव धवल जयसिंघानिया असून १ जानेवारीलाच त्याचा विवाह सोहळा संपन्न झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रिकेच्या खाली '२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना मतदान हाच आमच्यासाठी आहेर', असे वाक्य लिहिण्यात आले होते. अशाच स्वरुपाची आणखी एक लग्नपत्रिकाही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ती कर्नाटकमधील मंगळुरूची आहे. अत्तवार असे या कुटुंबाचे नाव असून, त्यांच्या मुलाचा विवाह १० फेब्रुवारीला होता आहे. या लग्नपत्रिकेच्या शेवटीही २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना मतदान हाच आमच्यासाठी आहेर असे वाक्य लिहिण्यात आले आहे. 


याआधीही नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लग्नपत्रिकेतून देण्याचे काम एका कुटुंबाने केले होते. या भल्यामोठ्या पत्रिकेत केंद्र सरकारच्या विविध योजनांची आणि मोदी सरकारच्या विकासकामांची माहितीच देण्यात आली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या यशात सोशल मीडियाची महत्त्वाची भूमिका होती.