प.बंगाल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये या आठवड्यातील तिसरी सभा घेतली. यावरुन भाजपासाठी इथली निवडणूक किती महत्त्वाची असणार आहे हे स्पष्ट आहेच. आज झालेल्या सभेत पंतप्रधानांनी पश्चिम बंगालशी माझे चहाचे नाते असल्याचे सांगितले. तुम्ही चहा बनवणारे आहात आणि मी विकणारा असे विधान त्यांनी यावेळी केले. चहावाल्यांचा दीदींना एवढा राग का येतो ? असा टोलाही त्यांनी लगावला होता. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. निवडणुकीच्या दिवसात ते चहावाला होतात आणि निवडणुकीनंतर ते राफेलवाला होतील. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्हाला पंतप्रधानांची भिती वाटत नाही उलट आम्ही एकत्र आहोत म्हणून तेच हैराण झाले असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. याआधी झालेल्या एका रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री लुटारुंना वाचवण्यासाठी धरणे करत आहेत. हजारो गरीबांना लुटणाऱ्यांच्या बाजुने उपोषणाला मुख्यमंत्र्यांनी बसण्याची ही पहीलीच वेळ असल्याचेही त्यांनी म्हटले होते. सीबीआयच्या रेड विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांसाठी कोलकातामध्ये उपोषणास बसल्या होत्या. जर तुम्ही माझ्याशी 'पंगा' घेतलात तर मी 'चंगा' होऊन जाईन असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी लगावला.



मोदींचा आरोप



पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे. मात्र, दादागिरी अन्य कोणाची तरी चालत आहे. शासनाच्या सर्व योजनांच्या नावाखाली प्रशासकीय दलालांना मध्यस्थी दलालांना अधिकार आहेत. पश्चिम बंगाल सरकारने काहीही केले नाही. पश्चिम बंगाल आपल्या कला आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. आज हे राज्य स्वायत्त आणि हिंसाचाराच्या पद्धतींसाठी ओळखले जात आहे, असे मोदी म्हणाले. आज पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांनी उच्च न्यायालयाच्या नव्या खंडपीठाचे उद्घाटन केले.  उच्च न्यायालयासंबंधी प्रकरणात तुम्हाला कोलकात्याला जावे लागणार नाही तर जलपायगुडी येथेच निर्णय लागतील असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. यामुळे तुमचा येण्याजाण्याचा वेळ आणि खर्च वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले. 20 वर्षांपूर्वी खंडपीठाची मागणी करण्यात आली होती. 12-13 वर्षांपूर्वी याला मंजूरी देखील देण्यात आली होती. पण आता हे खंडपीठ प्रत्यक्षात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.