नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप चिघळलाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांच्या चार जणांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं होतं. मात्र डॉक्टरांनी ही मागणी फेटाळून लावली असून ममतांनी चर्चेला यावं, अशी भूमिका घेतलीय. ममता बॅनर्जी यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी केलीय. तसंच आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारपुढे सहा अटी ठेवल्यात. मात्र अद्याप या अटींना कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं डॉक्टरांचं हे आंदोलन सुरूच आहे. तसंच ८०० हून अधिक डॉक्टरांनी राजीनामे दिले असून ३०० डॉक्टरांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चर्चेसाठी बोलावलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या या संपाला देशभरातील अनेक डॉक्टरांनी आपला पाठिंबा दिलाय. पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, मुंबई इथंही डॉक्टर रस्त्यावर उतरलेत. 'आयएमए'च्या प्रतिनिधीमंडळानं आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचीही भेट घेतली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याची मागणी केलीय. 



आज 'एम्स'सहीत १८ हून अधिक मोठ्या रुग्णालयातील १० हजारांहून अधिक डॉक्टर्स संपावर आहेत. 'डॉक्टर्स असोसिएशन'नं पश्चिम बंगाल सरकारला आंदोलनकर्त्या डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिलाय.