Election 2021: आता तृणमूल नेत्याच्या घराबाहेर EVM सापडले, निवडणूक आयोगाची कडक कारवाई
आसामनंतर (Assam) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ईव्हीएमबाबत ( EVM) एक मोठी घटना उघडकीस आली आहे.
कोलकाता : West Bengal Election 2021: आसामनंतर (Assam) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ईव्हीएमबाबत ( EVM) एक मोठी घटना उघडकीस आली आहे. हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया उत्तर विधानसभा सीटवरील (Uluberia North Assembly Seat) टीएमसी नेत्यांच्या (TMC Leader) घराबाहेर सोमवारी रात्री उशिरा ईव्हीएम सापडले. स्थानिक लोकांनी पोलिसांना कळविताच निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 दरम्यान आज (मंगळवारी) तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरु झाले आहे. बंगालमध्ये आज एकूण 31 जागांसाठी मतदान होत आहे. मतदान सुरु होताच भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तृणमूल काँग्रेसने मतदान केंद्रांवर मतदारांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास देण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे तृणमूल नेत्याच्या घराच्या बाहेर ईव्हीएम सापडल्याचा दावा भाजपने केला आहे.
उलुबेरिया उत्तर मतदारसंघातील (Uluberia North Assembly Seat) भाजपचे उमेदवारी चिरन बेरा यांनी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे. मतदानाच्या आदल्या रात्री तृणमूल काँग्रेसचे नेते गौतम घोष यांच्या घराच्या बाहेर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन आढळल्याचा दावा बेरा यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसकडून निवडणुकीत गडबड करण्यात येत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. रात्री उशिरा इथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सुरक्षादलांनी सौम्य लाठीमार केला.
टीएमसी नेते गौतम घोष यांच्या घराबाहेर ठेवलेले अनेक सीलबंद ईव्हीएम सापडले आहे. पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPF) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सेक्टर अधिकारी म्हणाले, 'आम्ही सेक्टर कार्यालयात पोहोचलो तोपर्यंत सीएपीएफने ते बंद केले होते. या प्रकरणात निवडणूक आयोगाने सेक्टर ऑफिसरला निलंबित केले आहे. टीएमसी नेत्याच्या घराबाहेर ईव्हीएम राखीव यंत्र सापडले होते, असे या निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
आसाममध्येही ईव्हीएम सापडले
यापूर्वी आसाममधील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात भाजप उमेदवाराच्या पत्नीच्या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ( EVM) सापडले. दरम्यान, आसाममधील करीमनगर शहराच्या बाहेरील भागात हिंसाचार झाला आणि त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. ईव्हीएमला स्ट्रांग रूममध्ये नेण्यासाठी भाजपा उमेदवाराचे वाहन वापरल्या जात असल्याचा लोक निषेध करत होते.