10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या; जमावाने पोलीस चौकीला लावली आग; आरोपीचा धक्कादायक खुलासा
Jaynagar Rape and Murder Case: पश्चिम बंगाल येथे एक पुन्हा खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे.
Jaynagar Rape and Murder Case: पश्चिम बंगाल पुन्हा एकदा हादरले आहे. बंगालच्या दक्षिणेकडील 24 परगणा जिल्ह्यातील जयनगर येथील एका 10 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने स्थानिक पोलिस चौकीलाच आग लावली आहे. तर, परिसरातील वाहनांची तोडफोड करुन पोलिसांवरही दगडफेक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. तर, पोलिसांच्या म्हणण्यानुसार एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचा गुन्हा कबुल केला आहे. त्याची चौकशी केल्यानंतर समोर आले की, घटनेच्या दोन दिवसाआधीपासून तो पीडित मुलीला आइस्क्रीम खाऊ घालत होता. तिच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. शुक्रवारी मुलीला त्याच्या सायकलवर बसवून एका अज्ञात स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. नंतर गळा घोटून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला.
शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांना मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणात शनिवारी साधारण 2 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला घटनास्थळी नेले जिथे त्याने पीडित मुलीची हत्या केली व मृतदेह सोडून निघून गेला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलीस चौकीला आग लावली तसंच तिथे असलेल्या वाहनांची तोडफोड केली.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. पोलिसांना तक्रार देऊनही त्यांनी कारवाई केली नाही. स्थानिक लोकांनी शनिवारी सकाळी जयनगर परिसरात मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर संतापलेल्या जमावाने महिसमारी पोलिस चौकीला आग लावली आणि पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळावरुन परत जावे लागले. वनंतर मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला.
जमावाला शांत करण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. एका स्थानिक व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार, मुलीच्या कुटुंबीयांना महिसमारी पोलिस चौकीत प्राथमिक तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तक्रारीनंतर लगेचच कारवाई केली नाही. आरजीकर रुग्णालयात महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर जशी प्रतिक्रिया तेव्हा पोलिसांनी दिली तशीच याही वेळेस दिली, असा आरोप करण्यात येत आहे.
एका पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एफआयआर दाखल करण्यात आली होती. सुरुवातीला चौकशीनंतर शनिवारी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसंच, पोलीस चौकीला आग लावणाऱ्या आणि सर्व दस्तावेज नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची ओळख तपासण्यात येत असून त्यांच्याविरोधात केस दाखल करुन कारवाई केली जाईल.