मुंबई : अभिलाषसारखे असे अनेक जण असतात... साधं सोपं जगणं त्यांना अजिबात मान्य नसतं... त्यांच्या नसानसांत साहस भरलेलं असतं... संघर्ष त्यांच्या डीएनएमध्ये असतो... संकटांना झुंजवायला त्यांना आवडतं... असे अनेक दर्यावर्दी राजे दरवर्षी गोल्डन ग्लोब रेसमध्ये भाग घेतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणत असेच अनेक वेडे आव्हानं पेलायला सज्ज झालेले असतात... अंगातली ताकद, मानसिक सामर्थ्य या सगळ्याचा कस लावत निसर्गाला आव्हान देत सज्ज होतात... स्वतःच्या कक्षा मोडत... स्वतःला सिद्ध करत... अशाच वेड्यांची स्पर्धा म्हणजे गोल्डन ग्लोब रेस... जगाला प्रदक्षिणा घालण्याची ही स्पर्धा... एक बोट आणि एकच माणूस अशी ही स्पर्धा... नजर ठरेल तिथवर फक्त समुद्र आणि समुद्र... आदळणाऱ्या लाटा, घोंगावणारा वारा आणि या सगळ्यामध्ये तुम्ही एकटेच... ही स्पर्धा जगाला प्रदक्षिणा घालण्याची...


वादग्रस्त गोल्डन ग्लोब रेस


१९६८ साली सुरू झालेल्या या स्पर्धेचं यंदाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष... सुरू झाल्यापासूनच ही स्पर्धा वादग्रस्त ठरली... अनेक स्पर्धक या स्पर्धेत अपयशी ठरतात, काहींचा मृत्यू होतो... तर एका स्पर्धकानं आत्महत्याही केलीय... त्यामुळेच ही स्पर्धा वादग्रस्त ठरलीय.... तरीही अनेक वेडे या स्पर्धेत दरवर्षी सहभागी होता... 


- ब्रिटीश संडे टाईम्स ही स्पर्धा आयोजित करतं


- फ्रान्समधून या स्पर्धेला सुरुवात होते आणि संपतेही फ्रान्समध्येच...


- 'केफ ऑफ गुड होप'ला प्रदक्षिणा घालून ही स्पर्धा सुरू होते


- सर रॉबिन नॉक्स जॉनटन यांनी पहिल्यांदा ३१२ दिवसांत ही स्पर्धा पूर्ण केली


- साधारणपणे या जगप्रदक्षिणेला २६० दिवस लागतात


- फ्रान्सचा ७२ वर्षांचा जेन लूक वॅन डेन हा सगळ्यात वृद्ध स्पर्धक तर इंग्लंडचा २८ वर्षांचा सुसी गुडॉल हा सगळ्यात तरुण स्पर्धक


- यंदाच्या स्पर्धेत १८ स्पर्धक होते. त्यातल्या सात स्पर्धकांनी मध्येच माघार घेतली होती... ११ जणांची जगप्रदक्षिणा सुरू होती


- १९६८ साली जे तंत्रज्ञान होतं, त्याच तंत्रज्ञानाच्या आधारावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती


- शिडाच्या बोटीत एकही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस नसतं... त्यामुळे संपर्क हे मोठं आव्हान असतं


- तीस हजार मैलांचा हा जगभराचा प्रवास एकट्यानं करायचा असतो


- कित्येक महिने चालणाऱ्या या स्पर्धेसाठी अन्नधान्याचा साठा आधीच बोटीवर करुन घ्यावा लागतो


- स्वयंपाक करण्यापासून ते बोट चालवण्यापर्यंत सगळं काही एकालाच करावं लागतं


 या स्पर्धेमधला सगळ्यात अवघड टप्पा म्हणजे हिंदी महासागर... हिंदी महासागरात खरं आव्हान असतं... हिंदी महासागरात १० मीटर उंचीच्या लाटा उसळतात.... ताशी १२० च्या वेगानं वारे वाहात असतात... शार्कसचा धोका असतो. १९६८ साली बेपत्ता झालेले तीन स्पर्धक अजूनही सापडलेले नाहीत. तरीही 'हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे... विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्यानं, ढळू दे दिशाकोन सारे...' असं आव्हान देत या वेड्या नावाड्यांचा प्रवास सुरू असतो... समुद्रात कुठल्याही क्षणाला मोठ्ठी लाट येऊन नाव डळमळते... भरकटते... आत्तापर्यंत गोळा केलेली हिंमत एका क्षणाला तुटते आणि सारं काही संपलं असं वाटायला लागतं... सगळा संघर्ष असतो तो त्या एका क्षणाचा... त्या क्षणात त्या नावाड्याला समुद्राला, लाटांना आव्हान देत पुन्हा उभं राहावं लागतं... सामना करावा लागतो... तो उभा राहातो... समुद्राला पुरून उरतो...


चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला...


अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला...