महिलेकडून चूकीच्या खात्यात पैसे जमा... SBIकडून मिळालं हे उत्तर...
ग्राहक ऑनलाइन माध्यमातून पैसे हस्तांतरित करताना चुकीच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करतात
मुंबई : सध्या सगळ्याच लोकांचा कल ऑनलाईन बँकिंगकडे वाढला आहे, त्यामुळे सर्वत्र लोकं आता छोट्यापासून ते अगदी मोठ्या रकमेपर्यंत ऑनलाईन बँकिंगचाच पर्याय स्वीकारत आहेत. परंतु ऑनलाईन बँकिंग करताना ग्राहकांना काही गोष्टींबाबत जागरुक असणे आवशक आहे. म्हणूनच भारतीय स्टेट बँक ग्राहकांना ऑनलाईन बँकिंगबाबत जागरूक करत आहे. आता नवीन खाते उघडण्यासाठी पैसे हस्तांतरित करण्याची सुविधाही ऑनलाइन माध्यमातून दिली जात आहे. परंतु काहीवेळा ग्राहकांना त्यांची चूक खूप महागात पडते.
बहुतेकदा असे घडते की, ग्राहक ऑनलाइन माध्यमातून पैसे हस्तांतरित करताना चुकीच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करतात. अशा परिस्थितीत ही चूक कशी टाळता येईल हे माहित असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर जर ही चूक कधी झाली तर आपण आपले पैसे परत कसे मिळवू शकता. हे देखील ग्राहकांना माहित असणे गरजेचे आहे.
ऑनलाइन पैसे देणाऱ्या ग्राहकांनी, तसेच चुकीच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाचे काय नियम आहेत हे देखील तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या सर्व नियमांबद्दल सांगणार आहोत.
हल्लीच कडेच एका एसबीआय ग्राहकाने सांगितले की, तिने चुकून 1 लाख रुपये चुकीच्या खात्यावर वर्ग केले आणि तिने ट्विटरद्वारे याची तक्रार केली आहे. यावर एसबीआयने उत्तर देताना बँकेचे नियम तिच्या सह सगळ्या बँकेच्या ग्राहकांना सांगितले आहेत.
एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "ग्राहकांना विनंती आहे की, कोणताही डिजिटल ट्रान्सफर करण्यापूर्वी लाभार्थीच्या खात्याचा तपशील पडताळून पहावा. हे देखील लक्षात घ्या की, ग्राहकाने केलेल्या चुकीच्या व्यवहारासाठी बँक जबाबदार राहणार नाही."
त्यानंतर त्यांनी सांगितले की, "ग्राहकांची गृह शाखा कोणत्याही जबाबदारी शिवाय दुसर्या बँकेकडे पाठपुरावा करू शकते. यासंदर्भात अधिक महिती आणि सहाय्यासाठी कृपया आपल्या होम ब्राँच आणि / बेनेफिशरी (समेरील व्यक्तीच्या) बँकेशी संपर्क साधू शकतात."
ट्रान्सफरपूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या?
यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे, जेव्हा जेव्हा तुम्ही कोणताही व्यवहार करण्यापूर्वी बेनेफिशरी किंवा लाभार्थीच्या खात्याचा तपशील तपासला आणि त्यानंतर पैसे ट्रान्सफरच्या शेवटच्या प्रक्रियेच्या वेळी तुम्हाला समरीमध्ये लाभार्थ्याचे नाव दिसते ते अवश्य तपासा आणि कन्फर्म करा.
यामध्ये जास्तीत जास्त तुमचे फक्त 30 सेकंद अधिक लागतील, परंतु त्यानंतरचा तुमचा त्रास वाचेल, तुम्हाला 30 सेकंदासाठी बँकेच्या हेलपाट्या माराव्या लागणार नाहीत.
तुम्ही पैसे परत कसे मिळवू शकता?
आपण ज्या खात्यात पैसे पाठवले आहेत तो खातेदार देखील त्याच बँकेचा ग्राहक असल्यास आपण त्या बँकेला कळवावे. अशा परिस्थितीत बँक कर्मचारी लाभार्थ्याशी संपर्क साधून पैसे परत पाठविण्याची विनंती करु शकतात.
जर पैसे घेणारी व्यक्ती यावर सहमत असेल, तर ते पैसे आपल्या खात्यात 7 कार्य दिवसात परत केले जातील. जर बँक आपल्या तक्रारीवर काहीही करत नसेल तर आपण Ombudsman कडे तक्रार करू शकता. अशी समस्या सोडवणारी ही एक सरकारी संस्था आहे.