बंगळुरु : भारतीय तरुण अधिक वेतन नाही तर सुरक्षित नोकरीला अधिक महत्त्व देत असल्याची माहिती सोमवारी एका अहवालातून समोर आली आहे. सुरक्षित नोकरीनंतर, तरुण दुसऱ्या क्रमांकावर जीवनात आणि कामात संतुलन राखण्याला अधिक महत्त्व देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भारतीय तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकरीप्रति अधिक आकर्षण असल्याचे दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्वेक्षणात देशभरातील बँकिंग आणि सरकारी नोकरीसाठी तयारी करीत असलेल्या पाच हजार तरुणांच्या प्रतिक्रियांचा आढावा घेण्यात आला. 'ओलिवबोर्ड'च्या सर्वेक्षणात आढळून आले की, ४४.३ टक्के तरुणांनी नोकरीच्या स्थिरतेसाठी मत दिले. तर ३६.७ टक्के तरुणांनी काम आणि जीवनातील संतुलन याची निवड केली. चांगल्या वेतनासाठी केवळ ११.१ टक्के तरुणांनी मत दिले.


'ऑलिव्हबोर्ड'चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक पाटील यांनी सांगितले की, जेव्हा आपण भारतीय तरूणांच्या आकांक्षांबद्दल बोलतो तेव्हा मोठी शहरे, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि स्टार्टअपच्या पलीकडे पाहणे महत्वाचे आहे. अधिकतर भारतीय लहान शहरं आणि खेड्यांमध्ये राहतात, जिथे सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीची मागणी सर्वाधिक आहे. आमचा सर्व्हे समाजातील या दुर्लक्षित वर्गातील तरुणांची स्वप्नं आणि त्यांच्या प्रेरणांवर प्रकाश टाकत असल्याचे पाटील यांनी सांगितले.


सर्वेक्षणानुसार, २३ टक्के तरुणांनी मॉक टेस्टसाठी इंग्रजीऐवजी हिंदी पर्याय निवडला. अभ्यासातून असे समोर आले की, ३९.४ टक्के उमेदवार एकाच वेळी तीन किंवा त्याहून अधिक स्पर्धा परिक्षांची तयारी करतात. जेईई, एनईईटी, बँकिंग, गेट यांसारख्या स्पर्धा परिक्षांसाठी ऑनलाइन कोचिंगचा अधिक वापर केला जात असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.