जेट एअरवेजचे काय होणार, कोणाकडे जाणार मालकी?
जेट एअरवेजचे पदच्च्युत अध्यक्ष नरेश गोयल यांनी पुन्हा एकदा कंपनीत घुसण्याचे प्रयत्न सुरु ठेवलेत.
नवी दिल्ली : जेट एअरवेजचे पदच्च्युत अध्यक्ष नरेश गोयल यांनी पुन्हा एकदा कंपनीत घुसण्याचे प्रयत्न सुरु ठेवलेत. रात्री उशिरा कंपनीची मालकी मिळवण्यासाठी नरेश गोयल यांनी जेटच्या लिलावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणारे पत्र सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जेट एअरवेज सध्या कमालीच्या आर्थिक संकटात सापडली असून विमाने उडवण्यासाठी कंपनीकडे ना इंधन आहे ना पैसे. त्यामुळे कंपनीची सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणे शुक्रवारपासून बंद आहेत.
सध्या जेट एअरवेजची मालकी सरकारी बँकांनी घेतली असून खासगी गुंतवणूकदारांना कंपनी विकण्यासाठी बोली लावण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नरेश गोयल यांनी आणखी खासगी गुंतवणूकदाराच्या मदतीने बोली लावण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहोत. पण नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने कंपनीच्या व्यवस्थापनातून बाजूला व्हावे, अशी अट बँका आणि काही परदेशी गुंतवणूकदारांनी घातली. त्यानुसार नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गोयल यांनी व्यवस्थापन मंडळातून राजीनामा दिला होता.
रात्री उशिरा पुन्हा एकदा गोयल यांनी आपली दावेदारी सादर केल्याने आर्थिक जगतात खळबळ उडाली आहे. दरम्यान, जेट एअरवेज विकत घेण्याच्या शर्यतीत गोयल यांना उतरू द्यायचे की नाही याचा निर्णय अजून झालेला नाही. बँका याबाबत काय निर्णय घेतात याकडे आर्थिक जगताचे लक्ष लागले आहे.