प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. तसंच यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. रतन टाटा फक्त उद्योजक नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही अनेकांसाठी आदर्श होते. यामुळेच अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरुन काढणं फारच आव्हानात्मक असणार आहे. दरम्यान रतन टाटा सर्वांसाठी आदर्श का होते? याचं उत्तर एका घटनेतून मिळतं. त्यांनी स्वत: हा किस्सा सांगितला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रतन टाटा यांनी एनडीटीव्हीला 2010 मध्ये मुलाखत दिली होती. यावेळी एका उद्योजकासह झालेल्या संभाषणाचा खुलासा त्यांनी केला होता. या उद्योजकाने रतन टाटा यांना तुम्हाला जर विमान कंपनी हवी असेल तर मंत्र्याला 15 कोटी देऊन टाका असा सल्ला दिला होता. पण रतन टाटा यांनी त्यावर नकार देत उत्तर दिलं होतं. 


नेमकं काय झालं होतं?


रतन टाटा यांना मुलाखतीत तुम्ही भ्रष्टाचार कसा टाळता? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी ही स्वत: केलेली प्रक्रिया असते असं सांगितलं होतं. यानंतर त्यांनी एक किस्सा सांगितला होता. रतन टाटा यांनी सांगितलं होतं की, "मी विमान प्रवासात असताना एक उद्योजक माझ्या शेजारी बसले होते. ते मला म्हणाले की, तुम्ही त्या मंत्र्याला 15 कोटी देऊन का टाकत नाही? तुम्हाला विमान कंपनी हवी आहे की नाही? हवी असेल तर पैसे देऊन टाका. 15 कोटींचा इतका कशाला विचार करता. मी त्या व्यक्तीला म्हणालो की, तुम्हाला हे समजणार नाही, आम्ही हे करत नाही. त्यावर ते म्हणाले तुम्ही मूर्ख आहात त्यावर मी उत्तर दिलं की, रात्री जेव्हा मी झोपायला जा तेव्हा आपण ते (भ्रष्टाचार) केलं नाही ही भावना असते'.


शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार


रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त समोर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तसंच प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील असं जाहीर केलं आहे. दरम्यान, सर्वसामान्यांनाही रतन टाटांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेता येणार आहे. 


आजचे सर्व कार्यक्रम रद्द


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी, "राज्य सरकारचे मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत," असं सांगितलं. मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, "रतन टाटा यांचे पार्थिव एनसीपीए येथे अत्यंदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. यासंदर्भात पोलिसांनी सर्व तयारी केली आहे."