नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधाने उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना काल पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर तुफान हल्ला चढविला होता. आज राज्यसभेतही याच चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी पुन्हा काँग्रेसचे वाभाडे काढले. यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत बोलताना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. शरद पवार यांच्याकडून काही तरी शिका असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला आहे.


हिरवळ असते तेव्हा शेत हिरवगार असतं. कुणी ती हिरवळ पाहिली आणि अचानक अपघात होऊन त्याची दृष्टी गेली तर आयुष्यभर त्याला ते हिरवंच चित्रं दिसत. 2013 पर्यंत दुर्दशेत दिवस गेले. 2014 मध्ये जनतेने अचानक प्रकाश निर्माण केला. त्यातून कुणाची दृष्टी गेली असेल तर त्यांना ते जुने दिवसच दिसणार, असा हल्लाच मोदी यांनी काँग्रेसवर केला.


आजारी असूनही शरद पवार मतदारसंघातील लोकांना प्रोत्साहित करताहेत. पण, तुमच्या इतकी निराशा का? अशी टीका करतानाच पवार यांच्याकडून काही तरी धडा घ्या, असा सल्लाही देत मोदी यांनी पवारांचे कौतुक केले.


सार्वजनिक जीवनात चढ उतार येत असतात. जय-पराजय होत असतात. त्यातून जी व्यक्तिगत निराशा निर्माण होते ती देशावर थोपवू नये. सत्तेत बसलो म्हणून देशाची चिंता करायची आणि विरोधी बाकावर बसलो म्हणजे देशाची चिंता करायची नाही असं असतं का? कोणाकडून शिकता येत नसेल तर पवारांकडून शिका, असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला.