लडाख : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखमधील रेझांग ला येथे नव्याने बांधलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले, जिथे भारतीय सैनिकांनी 1962 मध्ये चिनी सैन्याशी शौर्याने लढा दिला. हे स्मारक रेझांग लाच्या युद्धात बलिदान दिलेल्या शूर भारतीय सैनिकांना समर्पित आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका युद्धवीराचा विशेष सन्मान केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 1962 च्या युद्धात चीनविरुद्ध शौर्याने लढा देणाऱ्या 13 कुमाऊँ रेजिमेंटचे ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) आर.व्ही. जटार यांना युद्धस्मारकावर व्हीलचेअरवर नेले. यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख सीडीएस जनरल बिपिन रावतही होते. जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांची नावेही या स्मारकात जोडण्यात आली आहेत.



अधिकृत सूत्रांनी सांगितले की, स्मारकाचे उद्घाटन केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या क्षेत्रातील नियंत्रण रेषेवर चीनसोबत सुरू असलेल्या सीमा विवादाच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या सर्वोच्च कमांडर्ससोबत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे पाच दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर असल्याने ते रेझांग ला येथील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.