`पुलवामा हल्ल्यानंतर देश शोकसागरात बुडाला असताना मोदी शूटिंग करत होते`
जगाच्या पाठीवर असा पंतप्रधान कोणी पाहिला आहे का?
नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यानंतर देश शोकसागरात बुडाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शूटिंग करण्यात व्यग्र होते, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्यावरून पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले की, पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता तेव्हा नरेंद्र मोदी संध्याकाळपर्यंत जिम कॉर्बेट अभयारण्यात शूटिंग करण्यात व्यस्त होते. जगाच्या पाठीवर असा पंतप्रधान कोणी पाहिला आहे का? यावर काय बोलावे हेच कळत नाही, असे सुरजेवाला यांनी सांगितले. सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मोदींचे शूटिंग करतानाचे छायाचित्रही दाखवले.
या पत्रकार परिषदेत सुरजेवाला यांनी गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवालही उपस्थित केला. दहशतवाद्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स आणि रॉकेट लाँचर्स मिळालेच कसे? जैश-ए-मोहम्मदने ४८ तासांपूर्वीच धमकीचा व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. याशिवाय, ८ फेब्रुवारीला गुप्तचर यंत्रणांनीही तशी सूचना दिली होती. मग या सगळ्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवाल सुरजेवाला यांनी उपस्थित केला.
तसेच शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीच्या पालम विमानतळावर आणले तेव्हादेखील मोदी एक तास उशीराने आले. झाशीमध्ये असलेल्या सभेमुळे त्यांना उशीर झाला. शहीदांना मानवंदना देण्यापेक्षा मोदींना राजकारणाची अधिक चिंता होती, असा आरोपही यावेळी सुरजेवाला यांनी केला.
पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी दहशतवाद्याने घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.