चण्डीकवचामधील नवदुर्गा म्हणजे कोण ?
चण्डीकवचामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा , स्कंदमाता , कात्यायनी, कालरात्री, महागौरी , सिद्धिदात्री अशा नवदुर्गांचा समावेश आहे. या नवगौरी म्हणजे नेमक्या कोण ? याबाबतची खास माहिती पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.
मुंबई : चण्डीकवचामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा , स्कंदमाता , कात्यायनी, कालरात्री, महागौरी , सिद्धिदात्री अशा नवदुर्गांचा समावेश आहे. या नवगौरी म्हणजे नेमक्या कोण ? याबाबतची खास माहिती पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.
(१) शैलपुत्री ही हिमालयाची कन्या आहे. ही भगवान शंकराची पत्नी आहे. हिचे वाहन वृषभ असून ही द्विभूजा आहे.ही यश देणारी असून हिच्या उपासनेने मनातील इच्छा पूर्ण होतात. अशी देवीउपासकांची श्रद्धा आहे.
(२) ब्रह्मचारिणी ही ब्रह्मपद प्राप्त करून देणारी आहे. ही मोक्षदायिनी आहे , हिच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य , संयम इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अशी उपासकांची श्रद्धा आहे.हिने शुभ्रवस्त्र परिधान केले असून ही द्विभुजा आहे.
(३) चंद्रघंटा देवीच्या डोक्यावर आणि हातामध्ये चंद्राप्रमाणे घंटा आहे. किंवा जिच्या घंटेमध्ये चंद्र आहे ती चंद्रघंटा म्हणून ओळखली जाते. हिच्या उपासनेमुळे पाप आणि बाधा नष्ट होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. हिचे वस्त्र लाल रंगाचे आहे.
(४) कूष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्ताला त्याच्या आरोग्यविषयक काळजी घेण्याची बुद्धी व संकटांवर मात करण्याची शक्ती निर्माण होते अशी उपासकांची श्रद्धा आहे. हिला कोहळा जास्त आवडतो. नवचंडीयज्ञात कोहळा अर्पण करतात.
(५) स्कंदमाता म्हणजे पार्वती ! स्कंद म्हणजे कार्तिकेय ! देव दानव युद्धात स्कंद हा देवांचा सेनापती होता. स्कंदमाता शुभ्रवर्णा असून सिंहावर बसलेली आहे. स्कंदमातेच्या उपासनेने उपासकांचे चित्त शांत राहते अशी श्रद्धा आहे.
(६) कात्यायनी देवीला तीन नेत्र आहेत. ही सिंहावर आरूढ झालेली आहे. मत्स्यपुराणात हिला दहा भुजा असल्याचे म्हटले आहे.पहिल्या चार शक्तिपीठात हिचे नाव समाविष्ट आहे. हिच्या उपासनेने चतुर्विध पुरुषार्धाची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे.
(७) कालरात्रीचे दुसरे नाव आहे ' शुभंकरी ' ! ही देवी शुभफलदायिनी आहे अशी उपासकांची श्रद्धा आहे.ही देवता रौद्र स्वरूप असलेली,उग्र तप करणारी , तामसी शक्ती असलेली देवता अाहे. ही देवी दुष्ट भावनांचा नाश करते अशी समजूत आहे.
(८) महागौरी म्हणजे पार्वतीने भगवान शंकरांची तपश्चर्या करून त्यांची पत्नी झाली. परंतु ती काळ्या वर्णाची होती. तपश्चर्या करून तिने ब्रह्मदेवाचा वर मिळविला आणि ती गौरवर्णीय झाली. ती दु:ख दूर करते अशी उपासकांची श्रद्धा आहे.
(९) सिद्धिदात्रीला 'सिद्धिदा ' असेही म्हणतात. ही देवी अणिमा-महिमा, गरिमा- लधिमा,प्राप्ती-प्रकाम्य,ईशित्व- वशित्व, या अष्टमहासिद्धी प्राप्त करून देते अशी तिच्या उपासकांची श्रद्धा आहे.अणिमा म्हणजे सूक्ष्म रूप धारण करणारी, महिमा म्हणजे शरीर मोठे होणे, अरिमा म्हणजे सर्वांना प्रिय-पूजनीय, लधिमा म्हणजे हलके होणे किंवा शीघ्र काम करण्याची शक्ती, प्राप्ती म्हणजे कोणतीही गोष्ट अप्राप्य नसणे, प्राकाम्य म्हणजे सर्वत्र व्यापकत्व असणे आणि वशित्व म्हणजे सर्वाना वश करून घेणारी
या सर्व सिद्धी हिच्या उपासनेमुळे प्राप्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.