मुंबई : ओखी वादळाचा दक्षिण भारतानंतर महाराष्ट्रालही फटका बसला आहे. ओखी वादळ आता गुजरातच्या दिशेनं जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.


वादळांना नावं कशी दिली जातात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वादळांना नावं कशी दिली जातात, हा प्रश्न अनेकांना पडत असेल. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्स इकोनॉमिक अॅण्ड सोशल कमिशन फॉर एशिया अॅण्ड पॅसिफिक (इससीएपी) यांनी साल २००० पासून आशियातल्या वादळांना नावं द्यायला सुरुवात केली.


नागरिकांना हवामानाचा अंदाज आणि इशारा समजावा तसंच हवामान खातं आणि सामान्य नागरिकांमध्ये सोप्या पद्धतीनं संवाद व्हावा, यासाठी वादळांना नाव द्यायची पद्धत सुरु झाली.


९ भागांमधून ठरवली जातात नावं


जगभरामध्ये वादळांची नावं ९ भागांमधून ठरवली जातात. उत्तर अटलांटिक, पूर्वोत्तर पॅसिफिक, मध्य-उत्तर पॅसिफिक, पश्चिम-उत्तर पॅसिफिक, उत्तर हिंद महासागर, दक्षिण-पश्चिम हिंद महासागर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण पॅसिफिक आणि दक्षिण अटलांटिक अशा ९ भागांमधून वादळांची नावं ठरवली जातात.


ज्या भागामध्ये चक्रीवादळं तयार होतात त्याच्या आजूबाजूचे देश एकत्र येऊन चक्रीवादळाच्या नावांची यादी तयार करतात आणि मग वादळांना ही नावं ओळीनं दिली जातात.


उत्तर हिंद महासागरातले आठ देश


बांग्लादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड हे देश प्रत्येकी आठ नावं म्हणजेच एकूण ६४ नावं देतात. या देशांनी दिलेली नावं वादळाला दिली जातात.


उत्तर हिंद महासागरातल्या पहिल्या वादळाचं नाव ओनिल असं ठेवण्यात आलं. भारतीय हवामान खात्यानं २००४ साली वादळाला ओनिल हे नाव दिलं. यंदाच्या वादळाला असलेलं ओखी हे नाव बांग्लादेशनं दिलं आहे. ओखी याचा बंगाली अर्थ डोळा असा आहे.


याआधी आलेल्या मोरा या वादळानं इशान्य भारतात धुमाकूळ घातला होता. या वादळाला मोरा हे नाव थायलंडनं दिलं होतं. यानंतर येणाऱ्या वादळाचं नाव सागर ठेवण्यात येणार आहे. सागर हे नाव भारतानं दिलं आहे.


अशी सुरु झाली वादळाला नाव द्यायची पद्धत


१०० वर्षांपेक्षा आधीपासून अटलांटिकमधल्या वादळांना नावं दिली जातात. रोमन कॅथोलिक कॅलेंडवरच्या संतांच्या नावावरून वादळाचं नाव द्यायची सुरुवात कॅरेबियन बेटांवरच्या नागरिकांनी केली. वादळाच्या दिवशी कॅलेंडवरवर ज्या संतांचं नाव असेल ते नाव वादळाला दिलं जायचं.


वादळांना महिलांची नावं


दुसऱ्या विश्व युद्धापर्यंत वादळांना अशा प्रकारे नावं दिली जायची पण त्यानंतर हवामान विभागांनी वादळांना महिलांची नावं द्यायला सुरुवात केली. १९५३ मध्ये अमेरिकेच्या हवामान विभागानं A ते W मधल्या महिलांच्या नावांची यादी तयार केली. या यादीमध्ये Q, U, X, Y आणि Z ही नावं वगळण्यात आली. या यादीमधून अमेरिकेचं हवामान खातं वादळांना नाव द्यायचं.


वादळांना महिलांची नावं देण्यात आल्यामुळे अमेरिकेत ६० आणि ७० च्या दशकामध्ये आंदोलनं करण्यात आली. यानंतर १९७८मध्ये वादळांना पुरुषांची नावही द्यायला सुरुवात झाली.


वर्षाच्या पहिल्या वादळाला A अक्षरापासून तर दुसऱ्या वादळाला B अक्षरापासून सुरु होणारं नाव देण्यात यायचं. समअंकी वर्ष आणि विषम अंकी वादळाला पुरुषाचं नाव आणि विषम अंकी वर्ष आणि सम अंकी वादळाला महिलेचं नाव देण्याची पद्धत सुरु झाली.