छत्तीसगडचा मुख्यमंत्री कोण ? आज होणार निर्णय
काँग्रेसने 15 वर्षांनंतर राज्यात बहुमतासह सत्ता मिळवलीय.
छत्तीसगड : छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भूपेश बघेल आघाडीवर आहेत. दुपारी १२च्या सुमारास छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विधीमंडळ गटाची बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक घेतली.
15 वर्षांनंतर कॉंग्रेस
टी.एस.सिंह देव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत यांच्यासह राहुल गांधींनी चर्चा केली. काँग्रेसने 15 वर्षांनंतर राज्यात बहुमतासह सत्ता मिळवलीय. मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सोमवारी दुपारी साडेचार वाजता छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळतेय.
छत्तीसगडमध्ये अडीच अडीच वर्षाचे दोन मुख्यमंत्री असा फॉर्मुला ठरला असल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेसचे नेते पी.एल. पुनिया यांनी याचा इन्कार केलाय.