नवी दिल्ली : ९० टक्के भाजलेल्या अवस्थेत उन्नावमधील ती बलात्कार पीडित तरुणी आपल्या भावाला हे सांगत होती. रुग्णालयात मृत्यूशी झुंज देता देता आपल्या भावाशी ती बोलत होती. खरं तर गेल्यावर्षी बलात्कार झाल्यापासूनच ती जिवंत मरणयातना भोगत होती. आधी दोघा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला, नंतर आरोपींच्या कुटुंबियांनी तरुणीवर आणि तिच्या कुटुंबियांवर अत्याचार केले आणि उरल्या सुरल्या अब्रुचे धिंडवडे बेपर्वा पोलीस यंत्रनेनं काढले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- १२ डिसेंबर २०१८ रोजी या तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून शिवम आणि शुभम त्रिवेदी या दोघा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला.
- १३ डिसेंबर २०१८ ला तिनं तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं. पण पोलिसांनी गुन्हा नोंदवूनच घेतला नाही.
- २० डिसेंबर २०१८ ला तिनं रायबरेलीच्या पोलीस अधीक्षकांना रजिस्टर्ड पत्र पाठवून गुन्ह्याची माहिती दिली. पण तरीही गुन्हा नोंदवून घेण्यात आला नाही.
- अखेर ४ मार्च २०१९ ला रायबरेली कोर्टाच्या आदेशानंतर शिवम आणि शुभम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र दोघेही फरार असल्यानं १४ ऑगस्ट २०१९ संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिले.
- १९ सप्टेंबर २०१९ ला आरोपी शिवम त्रिवेदी कोर्टाला शरण आला.
- २५ नोव्हेंबर २०१९ रोजी हायकोर्टानं शिवमचा जामीन मंजूर केला. ५ दिवसांना त्याची जामिनावर सुटका झाली. तर पोलीस रेकॉर्डनुसार, शुभम त्रिवेदी फरारच होता.
- ५ डिसेंबर २०१९ ला पहाटे वकिलाला भेटायला तरुणी निघालेली असताना शिवम आणि शुभमसह ५ नराधमांनी तिला वाटेत गाठलं. तिला मारहाण केली आणि अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळलं.


जिवंत जाळल्यानंतर ४० तास ती मृत्यूशी झुंजत होती. आधी कानपूरला, तिथून लखनौ आणि शेवटी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिला हलवण्यात आलं. या प्रवासात ती भावाला एकच गोष्ट वारंवार सांगत होती... त्या नराधमांना सोडू नका. तिला जगायचं होतं, त्यांना फासावर लटकलेलं पाहायचं होतं. पण दुर्दैवानं शुक्रवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी तिची झुंज संपली. अन्यायाविरुद्ध लढणारा तिचा आवाज कायमचा बंद झाला.