इंदौर : मध्य प्रदेशातील इंदौर न्यायालयाने शुक्रवारी विनायक, शरद आणि पलक या तिघांना भय्यू महाराज यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. यापैकी पलक ही भय्यू महाराजांची अनेक वर्षांपासून शिष्या होती. महारांजांशी लग्न करण्याची तिची इच्छा होती. शरद आणि विनायक हेदेखील महाराजांचे सेवेकरी होते. पलकला महाराजांशी लग्न करण्यासाठी या दोघांची फूस होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी जून 2018 मध्ये आत्महत्या केली होती. पलकने भय्यू महाराज यांना धमकी दिली होती की, '16 जून 2018 रोजी तुम्ही माझ्याशी लग्न करावे'. पलकने महाराजांना त्यावेळी धमकी दिली होती, ज्यावेळी देशात दाती महाराजांनी आपल्या शिष्यावर बलात्कार केल्याची चर्चा सुरू होती.


पलकने ही संधी साधून भय्यू महाराजांवर दबाव आणला. तिने लग्नाची तारीख ठरवल्याच्या 5 दिवस आधी 11 जून रोजी  भय्यू महाराजांना कॉल केला होता. आणि धमकी दिली की, तुम्हाला माझ्याशी लग्न करावेच लागेल अन्यथा, दाती महाराजांसारखे पळावं लागेल. बदनामीच्या भीतीने भय्यू महाराजांनी त्याच्या दुसऱ्याच दिवशी स्वस्तःला गोळी घालून आत्महत्या केली.


पलकने मीडियाला बोलावून महाराजांची बदनामी करण्याचीही धमकी दिली होती. शिवाय तिने महाराजांकडून जादा पगाराची मागणी केली होती. तिला तिच्या कामाचे दीड लाख रुपये मिळत असत तर तिने अडिच लाख प्रति महिन्याची मागणी केली होती. पलक, शरद आणि विनायक महाराजांना झोपेच्या गोळ्या खाऊ घालत असे. महारांजांनी आपली बहिण आक्काजवळ या बाबतीत सांगितलं होतं.


भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नी माधवीच्या मृत्यू नंतर पलक महाराजांची केअर टेकर म्हणून काम पाहत होती. त्यामुळे महाराज आणि पलक जास्त वेळ एकमेकांच्या संपर्कात होते. माधवी यांच्या मृत्यूनंतर महाराजांनी डॉ. आयुषी यांच्यासोबत लग्न केले. पलक आणि तिच्या सहकाऱ्यांना ते रुचलं नाही. त्यानंतर त्यांनी महाराजांच्या विरोधात कट रचला.


पलक पुराणिकला संपत्तीची मोठी हाव होती. तिचा भय्यू महाराजांच्या संपत्तीवरही डोळा होता. 2017 मध्ये महाराजांनी डॉ. आयुषी यांच्याशी लग्न केले होते. परंतू त्या लग्नाच्या दरम्यान देखील ती महाराजांना ब्लॅकमेल करीत होती. पलकने स्वतःच्या बहिणीच्या लग्नात महाराजांकडून लाखो रुपये घेतले होते. अनेकदा ती महाराजांकडून वेगवेगळ्या कारणांवरून पैसे उकळत असे.


2018 मध्येच पोलिसांनी माहिती दिली होती की, भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करीत असताना नशेच्या किंवा झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस दिला जात होता. याशिवाय पलककडे महाराजांचे काही वयक्तिक व्हिडीओदेखील आढळून आले होते.