सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : काहीतरी वेगळं करायचं आहे.... असं म्हणत प्रत्येकजण आयुष्यात त्यांच्या वाट्याला आलेल्या काही गोष्टींच्या बाबतीत तक्रार करत असतो. पण, याच गोष्टींची तक्रार करत राहण्यापेक्षा आपल्याला मिळालेल्या काही क्षणांचा मनमुराद आनंद घेण्याला प्राधान्य देणारेही कमी नाहीत. अशाच गर्दीतलं एक नावं म्हणजे सुनील कुमार गुर्जर म्हणजेच 'राहगीर'. सोशल मीडियावर तो स्वत:ची ओळख 'राहगीर' म्हणूनच सांगतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक व्यक्ती म्हणून आणि एक प्रवासी किंवा वाटाड्या म्हणून 'राहगीर' ही ओळखच त्याला खूप काही देऊन गेली असं तो मोठ्या गर्वाने सांगतो. आतापर्यंत १६ राज्यांमध्ये फिरलेला राहगीर पुन्हा एकदा एका नव्या प्रवासाला निघत आहे. या प्रवासात तो भारताच्या नकाशाच्याच आकारानुसार पुण्याहून त्याच्या प्रवासाची सुरुवात करत पुण्यातच या प्रावसाचा शेवट करणार आहे. 


पुणे, मुंबई, चंडीगढ, लेह, अलिगढ, गुवाहाटी, कोची असा प्रवास करत या वाटेत येणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत तो या प्रवासात काही नव्या व्यक्तींना भेटणार आहे. अनुभवांचं गाठोडं पुरतं भरणार आहे. राहगीर हा एक असा अवलिया आहे, जो फक्त छंद म्हणून नव्हे, तर इतरांच्या आयुष्यात आनंदाची उधळण करण्यासाठीही प्रयत्नशील असतो. त्याला या प्रवासात साथ असते ती म्हणजे, त्याच्या लेखणीची, गिटारची आणि आवाजाची. 


आतापर्यंत त्याने स्वत:ची जवळपास ४००हून अधिक गाणी लिहिली आणि संगीतद्ध केली आहेत. सुरेख असे शब्द, राहगीरचा आवाज आणि गाण्याची चाल प्रवासवेड्यांना जरा जास्तच भावते. 


आयटी कंपनीत काम केल्यानंतर हे क्षेत्र आपल्यासाठी नाही, अशा भावनेने त्याने प्रवासाची वाट निवडली त्या क्षणापासून त्याचा प्रवास अविरतपणे सुरु आहे तो आजतागातच सुरुच. राहगीर या प्रवासादरम्यान, त्याची गाणी विविध कॅफे, जॅमिंग सेशन आणि इतरही काही ठिकाणी सादर करतो, जेथे त्याला खऱ्या रसिकांची दादही मिळते. 



आतापर्यंत त्याला प्रवासादरम्यान जितके अनुभव आले आहेत, ते त्याने 'आहिल' य़ा पुस्तकात लिहिले आहेत. आता हाच राहगीर पुन्हा एकदा त्याच्या नव्या प्रवासाला निघण्यास सज्ज झाला असून, पुढच्या काही दिवसांमध्ये देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्या तो तुम्हाला दिसू शकतो. त्यामुळे तसं झाल्यास आश्चर्यचकित होण्यात वेळ दवडण्यापेक्षा या अवलियाशी मनमुराद संवाद साधा.... मुख्य म्हणजे त्याकरता प्रवासाला  निघा लोकहो....