BJP President after JP Nadda : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सरकार स्थापनेचं आमंत्रण दिल्यानंतर आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्याचबरोबर मोदी कॅबिनेट 3.0 चा शपथविधी संपन्न झाला आहे. यामध्ये 72 मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यामध्ये भाजपने अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांचा देखील समावेश आहे. जेपी नड्डा यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने आता भाजपच्या 'एक व्यक्ती एक पद' या पॉलिसीनुसार भाजपा नवा अध्यक्ष (BJP President) मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP President JP Nadda) यांचा कार्यकाल येत्या 6 जून रोजी संपणार आहे. त्यानंतर नड्डा यांच्या जागी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नव्या नेत्याची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी ज्यांची नावे चर्चेत होती त्यापैकी शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, अमित शहा यांनी शपथ घेतल्याने आता भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? असा सवाल विचारला जात आहे.


राष्ट्रीय पातळीवर बदल झाल्यास महाराष्ट्रातही भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नव्या नावाची घोषणा होऊ शकते. त्यामुळे आता भाजप कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.


दरम्यान, महाराष्ट्रातील 6 खासदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये दोघा कॅबिनेट मंत्र्यांचा, एका स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्र्याचा, तर 3 राज्यमंत्र्यांना समावेश आहे. भाजपचे नितीन गडकरी आणि पियूल गोयल यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेना शिंदे गटाचे ७ खासदार निवडून येऊनही त्यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद आलंच नाही. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र कार्यभार असलेलं राज्यमंत्रीपद देण्यात आलंय. तर आरपीआय आठवले गटाचा एकही आमदार, खासदार नसताना रामदास आठवलेंची पुन्हा एकदा राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. भाजपच्या रक्षा खडसे आणि पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांनाही राज्यमंत्रीपद देण्यात आलंय.