Hathras Stampede: मंगळवारी हाथरसच्या सिंकदरराऊमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 116 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. उत्तर प्रदेशमधल्या हाथरसमध्ये ही दुर्देवी दुर्घटना घडली आहे. मात्र आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, अशी परिस्थिती का निर्माण झाली. हाथरसचे खासदार अनुप प्रधान यांनीही यासंदर्भात प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं की, कथा संपल्यानंतर निवेदकाला भेटण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. यावेळी जमावाला त्यांच्याकडे यायचे होते. मात्र ज्यावेळी ही गर्दी थांबवण्याचा प्रयत्न केलं तेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कडक उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्रासलेल्या भाविकांनी निवेदक गेल्यानंतर बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. यावेळी तो बाबा निघेपर्यंत सत्संगात उपस्थित स्वयंसेवकांनी गर्दी थांबवली. यामुळे त्याठिकाणी चेंगराचेंगरी झाली. लोक बाहेर पळू लागले, एकमेकांवर उड्या मारू लागले. महिला, मुले आणि पुरुष गर्दीमुळे खाली पडले आणि चिरडले गेले. खाली पडलेल्यांना चिरडून लोक पळत राहिले.


नेमकं काय घडलं?


हाथरस येथील सिकंदररावमध्ये फुलराईत एटा हायवेच्या बाजूला नारायण साकार हरीचा सत्संग सुरू होता. लाखो लोक इथे आले होते. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास या ठिकाणीची कथा संपली. यानंतर कथाकार बाहेर येऊ लागले. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या जमावाला स्वयंसेवकांनी रोखलं. बाबांना निघायला तब्बल 10 ते 15 मिनिटं लागली. पंडालमधील कडक उष्मा आणि आर्द्रतेने त्रस्त झालेल्या भाविकांनी बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. यावेळी स्वयंसेवकांना गर्दी हाताळता आली नाही. याचवेळी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरी होताच लोक खाली पडले. यावेळी 10 ते 15 मिनिटांत सत्संगाच्या ठिकाणी मृतदेहांचं दृश्य दिसू लागले. चेंगराचेंगरीत महिला, मुले आणि पुरुष अडकले, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.



चेंगराचेंगरीत आर्द्रतेमुळे भाविक झाले बेशुद्ध


सिकंदररावमधील सत्संगात झालेल्या अपघाताने खळबळ उडाली. यावेळी एवढी मोठी दुर्घटना घडेल अशी कोणी कल्पनाच केली नव्हती. चेंगराचेंगरीत जीव गमावलेले बहुतांश लोक आर्द्रतेमुळे बेशुद्ध झाले असल्याची माहिती आहे. बेशुद्ध पडल्याने लोकांना जीव गमवावा लागला. 


अनेक राज्यांतून भाविक आले होते


राजस्थान, दिल्ली, एनसीआरसह पश्चिम उत्तर प्रदेशातील लोक सत्संगात सहभागी झाले होते. चेंगराचेंगरीचे वृत्त घटनास्थळी पसरताच नागरिकांनी त्यांच्या प्रियजनांच्या शोधात धाव घेतली. बस आणि खासगी वाहनांनी सत्संगासाठी एकत्र आलेले लोक वाहनांमध्ये आपल्या प्रियजनांचा शोध घेत राहिले. दरम्यान इथली भयंकर दृश्य पाहून लोकांचा जीव थरथर कापला.