मुंबई : झारखंडमध्ये भाजपचा 'निक्काल' लागला आहे. याला भाजपची काही धोरणं कारणीभूत ठरली आहेत. एकट्यानं लढणाऱ्या भाजपविरोधात जेएमएम आघाडीनं गोळीबंद प्रचार केल्याचं फळ त्यांना मिळालं आहे. या निकालावरून भाजपनं धडा घेण्याची गरज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडमध्ये भाजप चारीमुंड्या चित झाल्यामुळे राष्ट्रीय मुद्द्यांवर राज्याची निवडणूक लढण्याचा आणखी एक प्रयोग फसला आहे. अनुच्छेद ३७०च्या मुद्द्यावर महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये स्पष्ट बहुमतापासून पक्ष दूर राहिला. आताही राममंदिर, एनआरसी हे मुद्दे झारखंडच्या जनतेनं नाकारले आहेत. 
भाजपच्या पराभवासाठी अनेक कारणं सांगता येण्यासारखी आहेत.


१. सर्वाधिक २७ टक्के लोकसंख्या आदिवासी असूनही भाजपनं या समाजाला नेतृत्व दिलं नाही. 
२. अनुच्छेद ३७०, राममंदिर, NRC वर फोकस ठेवून स्थानिक मुद्द्यांवर फारशी चर्चा केली नाही. 
३. आयारामांना तिकीटं दिली गेली. यामुळे १० जागा गमावल्या.
४. २०१४ मध्ये भाजप-आजसू एकत्र होते. मात्र यावेळी जागावाटपावरून दोघांचं फाटलं.
५. त्यामुळे राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेला महातो समाज भाजपपासून दुरावला. 
६. बिहारमध्ये एकत्र सरकार असतानाही नितीश कुमारांच्या जेडीयूसोबत जुळवून घेण्यात भाजपला अपयश आलं.
७. जमशेदपूरच्या ८६ वस्त्या अनियमित ठरवल्यामुळे खुद्द मुख्यमंत्री रघुवर दास यांना पराभवाचा सामना करावा लागला.


दुसरीकडे जेएमएम-काँग्रेस-राजद आघाडीनं मात्र भाजपशी दोन हात करायची जय्यत तयारी आधीपासूनच केली होती. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच तीन्ही पक्षांचं जागावाटप पूर्ण झालं होतं. दास यांनी केलेल्या आक्रमक टीकेमुळे हेमंत सोरेन यांना अधिक सहानुभूती मिळाली. निवडणूक प्रचार स्थानिक मुद्दे आणि रघुवर दास यांचं अपयश याभोवतीच केंद्रीत ठेवलं.


एनआरसीच्या मुद्द्यावर अल्पसंख्यक मतांचं ध्रूवीकरण करण्यात यश आलं. राहुल, प्रियंका, तेजस्वी यादव यांनी शिबू सोरेन यांनाच पुढे ठेवून सगळा प्रचार केला. मोदी-शाह यांच्या सभांचाही भाजपला फायदा झाला नसल्याचं दिसतं आहे.


मोदी आणि शाह यांनी विधानसभेच्या ६० जागांसाठी १८ सभा घेतल्या. २०१४ मध्ये या ६० पैकी २९ जागा भाजपनं जिंकल्या होत्या. मात्र यावेळी यातल्या १० जागा पक्षानं गमावल्या. दुसरीकडे राहुल-प्रियंका गांधींनी अनुक्रमे ५ आणि एक सभा घेतली. या सभांमध्ये २४ जागा कव्हर झाल्या होत्या. यातल्या केवळ २ जागा काँग्रेसकडे होत्या. त्यामध्ये चार जागांची भर घालण्यात काँग्रेसला यश आलंय. 


भाजपच्या वर्चस्ववादाला झारखंडच्या जनतेनं धक्का दिलाय. राज्यांमध्ये राष्ट्रीय मुद्दे चालणार नाहीत, हाच या निकालाचा धडा आहे. भाजपला विधानसभा निवडणुकांमध्ये कामगिरी उंचावायची असेल तर स्थानिक मुद्द्यांना अधिकाधिक प्राधान्य द्यावं लागेल आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे वेळप्रसंगी नमतं घेऊन स्थानिक मित्रपक्षांशी जुळवून घ्यावं लागेल.