पंतप्रधान श्रीराम दर्शनाआधी गेले हनुमान टेकडीवर, जाणून घ्या परंपरा
प्रभु रामाचे दर्शन करण्याआधी हनुमान टेकडीचे दर्शन घेणं महत्वाचं
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येला पोहोचल्यानंतर प्रभु रामाच्या दर्शनाआधी हनुमान मदिंरात गेले. हनुमानाचे दर्शन सर्वात आधी का घेतलं ? याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. पण इतिहासामध्ये याला मोठं धार्मिक महत्व आहे. वाराणसीमध्ये ज्या काल भैरवला काशीला कोतवाल म्हटले जाते तिथे जाणं गरजेचं असतं. त्या ठिकाणाला तशी मान्यत आहे.
लंका दहन केल्यानंतर हनुमान हे शरयू नदीच्या दाहीनी तटावरील ऊंच ठिकाणी गुहेत राहू लागले होते. इथूनच ते अयोध्येची रक्षा करत असे सांगितले जाते. या जागेला हनुमान टेकडी किंवा रामकोट म्हटले जाऊ लागले. कालांतराने इथे भव्य मंदीर बनले.
ज्या पद्धतीने गुहा असते, तशाच पद्धतीने आत जाण्यासाठी ७६ पायऱ्या या ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रभु रामाचे दर्शन करण्याआधी हनुमान टेकडीचे दर्शन घेणं महत्वाचं मानल गेलं. यासाठी पंतप्रधान मोदी हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत आधी हनुमान टेकडी येथे दर्शनासाठी गेले. आणि त्यांनी प्रभुरामाच्या दर्शनाची परवानगी मागण्याची परंपरा पूर्ण केली.
गेल्या अनेक दिवसांपासून रामजन्मभूमिपूजनाचा कार्यक्रम कधी संपन्न होणार याची चर्चा रंगली होती. आज अखेर तो दिवस आला आणि ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये अनेक नेतेमंडळी संतमहंत उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. सध्या अयोध्येत सर्वत्र रामनामाचा जयघोष होत आहे.
दरम्यान, उद्योगपती आणि अशोक सिंहल फाउंडेशनचे कार्यकर्ते महेश भाग चंदका यांनी सर्व पाहुण्यांना दहा ग्रॅम चांदीची नाणी भेट देण्याचं जाहीर केलं आहे. यासंबंधीत माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे.
पाहुण्यांना भेट स्वरूपात देण्यात येणाऱ्या चांदीच्या नाण्याची महत्त्वाची गोष्टी म्हणजे नाण्याच्या एका बाजूला प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचं छायाचित्र असेल. तर दुसऱ्या बाजूला राम मंदिर ट्रस्टचं चिन्ह असणार आहे.