अमित शाह यांच्याकडून दुधाचा ग्रॅममध्ये उल्लेख? जाणून घ्या Viral Videoमागील सत्य
गृहमंत्री अमित शाह यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे
जागतिक डेअरी परिषद 2022 कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) 12 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे गेले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शाह यांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण त्यांच्या भाषणाचा एक छोटासा भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवरून विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत.
काय म्हणाले अमित शाह?
या परिषदेमध्ये संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, "1969-70 मध्ये प्रति व्यक्ती दुधाचे उत्पादन (Milk Production) 40 ग्रॅम होते. को ऑपरेटिव्ह डेअरीमुळे 2021 मध्ये हे उत्पादन प्रति व्यक्ती 155 ग्रॅम होत आहे. ही मोठी कामगिरी आहे."
अमित शाह यांनी दुधाचे प्रमाण सांगताना ग्रॅमचा उल्लेख केला. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरही युजर्सनी व्हिडीओ शेअर करत अमित शाह यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेस (congress) पक्षाच्या अधिकृत मीडिया प्लॅटफॉर्म आयएनसी टीव्हीने (INC TV) व्हायरल व्हिडिओ ट्विट करत, गृहमंत्री श्री अमित शहा दूध लिटर ऐवजी ग्रॅममध्ये मोजताना, असा टोला लगावला आहे.
आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आशुतोष एस.सेंगर यांनीही हा व्हिडिओ ट्विट करत, राहुल गांधी पीठाचे वजन लिटरमध्ये करतात आणि अमित शाह दुधाचे वजन ग्रॅममध्ये करतात. दोन्ही पक्षांचे स्वतःचे पप्पू आहेत, असे म्हटलं आहे.
ट्विटरसोबतच अमित शाह यांचा हा व्हिडिओ फेसबुकवरही प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र अमित शाह यांनी केलेला उल्लेख योग्य असल्याचं समोर आलं आहे.
अमित शाह यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही (YouTube) हा व्हायरल व्हिडिओ आहे. 12 सप्टेंबर 2022 रोजी अमित शाह यांनी ग्रेटर नोएडा,उत्तर प्रदेश येथे वर्ल्ड डेअरी परिषद 2022 दरम्यान भाषण केले.
या भाषणातील एक भाग व्हायरल होत आहे. एकूण 32 मिनिटे 38 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये 25 मिनिटे 8 सेकंदानंतर अमित शाह म्हणतात की,"आकड्यांवर नजर टाकली तर 1969-70 मध्ये भारतात प्रति व्यक्ती 40 ग्रॅम दूध उपलब्ध होते.सहकारी दुग्धव्यवसायामुळे आज 2021 मध्ये दूध उत्पादन 40 ग्रॅमवरून 155 ग्रॅमपर्यंत वाढलं आहे. हे खूप मोठे यश आहे."
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या ( National Dairy Development Board) वेबसाइटवर राज्यानुसार दरडोई दूध उपलब्धतेबाबत असलेल्या आकडेवारीनुसार, प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धताही प्रतिदिन ग्रॅमच्या आधारे दाखवण्यात आली आहे.
याशिवाय, इकॉनॉमिक्स टाइम्स, बिझनेस स्टँडर्ड आणि सीएनबीसी टीव्ही 18 सारख्या माध्यमांनी देखील दुधाची दरडोई उपलब्धता ही प्रतिदिन ग्रॅमच्या प्रमाणामध्ये नोंदवली आहे.
तसेच आर्थिक सर्वेक्षण 2021-2022 (Economic Survey of India, 2021-22) मध्येही ग्राममध्येच प्रति व्यक्ती दुधाची आकडेवारी सांगितली आहे.तसेच अमित शाह यांनी दूध उत्पादनाच्या 155 ग्रॅम प्रतिदिनाचा स्त्रोत सांगितलेला नाही. पण आर्थिक सर्वेक्षण 2021-2022 मध्ये 2021 पर्यंत भारतात दरडोई दुधाची उपलब्धता 427 ग्रॅम प्रतिदिन आहे.
दरम्यान, अमित शाह यांच्या भाषणाचा काहीच भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अमित शाह यांनी आपल्या संपूर्ण भाषणात ग्राममध्ये दूधाचा उल्लेख करण्यापूर्वी दरडोई दूध उत्पादनाचा उल्लेख केला होता, तो व्हायरल व्हिडीओमध्ये घेतला गेला नाही. प्रति व्यक्ती दुधाचे उत्पादन दर्शवण्यासाठी ग्रॅमचा उल्लेख केला जातो