लोक इलेक्ट्रिक कार का खरेदी करत नाहीत? टाटाच्या एमडींनी दिलं उत्तर
Electric Cars : सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनची समस्या नसल्याचे सांगत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी लोकांच्या कार खरेदीबाबत भाष्य केलं आहे.
Electric Cars : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्स इलेक्ट्रिक (Tata Motors) वाहन क्षेत्रात सध्या आघाडीवर आहे. कंपनी लवकरच आपल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. टाटा कंपनीने आता इलेक्ट्रिक वाहनांचे विशेष शोरूम (Tata.ev) सुरू केले आहे. अशातच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजाराबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. येत्या वर्षात स्थानिक बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची विक्री मध्यम स्तरावर राहण्याची अपेक्षा आहे, असे शैलेश चंद्र यांनी सांगितलं आहे.
देशातील इलेक्ट्रिक कारची देशांतर्गत विक्री 2023 मध्ये सुमारे 90,000 ते 95,000 कार असेल, जी सुमारे 90 ते 100 टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये टाटा मोटर्सचा हिस्सा 80 टक्क्यांहून अधिक आहे, असे शैलेश चंद्र म्हणाले. "इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या विक्रीतील वाढ दरातील ही घसरण मंदी म्हणून समजू नये. चालू वर्षात स्थानिक बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 90-95 टक्के वाढून 100,000 युनिट्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे," असेही शैलेश चंद्र यांनी स्पष्ट केले.
"आता उत्पादन आणि किंमत ही देखील मोठी समस्या नाही. कारण उत्पादनांनी स्वतःला अधिक दमदार उत्पादक असल्याचे सिद्ध केले आहे. यामध्ये चालवण्याचा खर्च, देखभालीचा खर्च कमी आहे. मग लोकांना (ईव्ही खरेदी करण्यापासून) काय थांबवत आहे? तर प्रामुख्याने चार्जिंगचे अडथळे यामध्ये आहेत. हेच कारण एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिक वाहन घेण्यापासून मागे ठेवत आहेत," असेही शैलेश चंद्र म्हणाले.
"ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक वाहन घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि इन्फ्लेक्शन पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी एक स्थिर धोरण आराखडा आवश्यक आहे. सरकार सध्या बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांवर 5 टक्के कमी वस्तू सेवा दर लावते. अनेक राज्य सरकारांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर रोड टॅक्सही माफ केला आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी वाहन खरेदीचा खर्च कमी झाला आहे," असेही चंद्रा म्हणाले.
"ही परिस्थिती सोडवण्यासाठी पुढच्या वर्षीपासून भारतात जास्त श्रेणीच्या इलेक्ट्रिक कार आणल्या जातील. भातातील सुमारे 85 टक्के इलेक्ट्रिक कारचे अंतर 400 किलोमीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे 400 किमी पेक्षा जास्त रिअल रेंज असलेल्या इलेक्ट्रिक कार आणल्या गेल्यास, चार्जिंग पॉइंट्सची चिंता मिटेल आणि अधिक लोक ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करतील," असे चंद्रा यांनी स्पष्ट केले.