माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निळ्या रंगाचीच पगडी का घालायचे? स्वतः सांगितलं होतं कारण?

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झालं. त्यांनी 26 डिसेंबर रोजी रात्री 9.51 वाजता अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग कायमच निळ्या रंगाची पगडी घालायचे त्यामागचं कारण काय?
Manmohan Singh Death News : डॉ. मनमोहन सिंग ज्यांनी 10 वर्षे भारताचे पंतप्रधान पदाच्या माध्यमातून देशाची सेवा केली. गुरुवारी डॉ. मनमोहन सिंग यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी मनमोहन सिंग यांचे गंभीर आजारांमुळे निधन झाले. भारतीय राजकारण आणि अर्थशास्त्रात त्यांचे मोठे योगदान आहे.
मनमोहन सिंग यांचा जन्म 1932 मध्ये झाला. ते एक प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी होते. ते त्यांच्या साध्या स्वभावासाठी आणि सौम्य बोलण्यासाठी विशेष प्रसिद्ध होते. त्यांच्या वेगळेपणातील आणखी एक बाब म्हणजे त्यांची निळ्या रंगाची पगडी. डॉ. मनमोहन सिंग कायम एकाच रंगाची पगडी घालत असतं. ही पगडी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनली होती.
कुणी ठेवलं 'ब्लू टर्बन' असं टोपणनाव
2006 मध्ये मनमोहन सिंग यांना केंब्रिज विद्यापीठातून 'डॉक्टरेट ऑफ लॉ' ही मानद पदवी देण्यात आली. तेथे उपस्थित असलेले ड्यूक ऑफ एडिनबर्ग आणि विद्यापीठाचे कुलपती प्रिन्स फिलिप यांचे त्यांच्या निळ्या पगडीकडे लक्ष वेधले. यावेळी मनमोहन सिंग यांनी ही पगडी का घातली हे सांगितले होते. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले की, कॉलेजच्या दिवसांपासून निळ्या रंगाची पगडी घालायचे. तेव्हापाससून त्यांचे मित्र त्यांना 'ब्लू टर्बन' या टोपणनावाने हाक मारत.
या कारणामुळे घालायची निळी पगडी
निळा हा त्यांचा आवडता रंग असल्याचेही माजी पंतप्रधानांनी सांगितले. यामुळेच त्यांनी या रंगाची पगडी घालण्यास सुरुवात केली. कालांतराने, त्याची निळ्या रंगाची आवड कायम राहिली, जरी आता रंगात किंचित फरक दिसू लागला होता. त्यांची निळी पगडी केवळ ओळखच बनली नाही, तर ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या अनोख्या दृष्टिकोनाचे प्रतीक बनली.