मिल्खा सिंग यांना का म्हटले जाते `फ्लाइंग सिख`? पाकिस्तानने का दिला हा किताब? जाणून घ्या
`फ्लाइंग सिख` म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंह यांची कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरली.
चंदीगड : 'फ्लाइंग सिख' म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंह यांची कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरली. पत्नीनंतर त्यांचं कोरोनामुळे निधन झालं. मिल्खा सिंह यांचं कोरोनामुळे रात्री उशिरा निधन झालं.
मिल्खा फ्लाइंग सिख कसे झाले?
मिल्खा महान क्रीडापटू होते. जगभरातील लोक त्यांना फ्लाइंग सिख म्हणून संबोधू लागले. त्याचं कारणही तसं खास आहे. 1960 मध्ये मिल्खा सिंग यांना भारत पाकिस्तान एथलेटिक्स सामन्यांमध्ये सहभागाचे निमंत्रण आले. टोक्यो एशियन गेम्समध्ये त्यांनी सर्वश्रेष्ट धावपटू अब्दुल खालिकला 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरवलं होतं.
पाकिस्तानींची इच्छा होती की, आता या दोघांचा सामना पाकिस्तानच्या जमीनीवर व्हायला हवा. मिल्खा यांनी पाकिस्तान जाण्यास नकार दिला. कारण विभाजनाच्या वेळच्या कटू आठवणी त्यांना छळत असत. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती.
परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या आग्रहाखातर ते पाकिस्तानला गेले. लाहौरच्या स्टेडियमवर स्टार्टने पिस्तुल सोडली. अन् मिल्खा यांनी धावायला सुरूवात केली. दर्शक जोरदार घोषणाबाजी करू लागले. पाकिस्तान जिंदाबाद... अब्दुल खालिक जिंदाबाद...खालिक मिल्खाच्या पुढे होते. परंतु 100 मीटर पूर्ण झाल्याच्या आधीच त्यांनी खालिकला मागे सोडलं.
त्यानंतर मिल्खा सुसाट वाऱ्याच्या वेगाने धावत रिबिनला धडकले. त्यावेळी ते खालिकच्या बराच पुढे आणि 20.7 सेकंद पुढे होते. ही तेव्हाच्या विश्व विक्रमाची बरोबरी होती. जेव्हा धाव संपली तेव्हा खालिक मैदानावरच झोपून रडायला लागले.
मिल्खाने त्यांना उठवले आणि पाठ थोपटून म्हटले की, ''हार - जीत खेळाचा एक भाग आहे. याला मनाला लावून घेऊ नये''.
धावल्यानंतर मिल्खा यांनी विजयी दौड लगावली. मिल्खाला पदक देताना पाकिस्तानी राष्ट्रपती फील्ड - मार्शल अय्युब खां यांनी म्हटले की, '' मिल्खा आज तुम दौडे नही, उडे हो. मे तुम्हे फ्लाइंग सिख का खिताब देता हू''