शौचालयाच्या पैशांनी पतीने खरेदी केला स्मार्टफोन आणि मग...

`टॉयलेट एक प्रेम कथा` हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात शौचालयाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. पण झारखंडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.
धनबाद : 'टॉयलेट एक प्रेम कथा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात शौचालयाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. पण झारखंडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.
झारखंडमधील धनबादमध्ये राहणा-या राजेश महतो आणि त्याची पत्नी लक्ष्मी देवी यांचा विवाह ११ वर्षांपूर्वी पार पडला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. संपूर्ण परिवार मजदुरीतून मिळणा-या पैशांतून चालत होते.
राजेश महतो याच्या घरात शौचालय नव्हतं. पण, दोन महिन्यांपूर्वी नगरपालिकेमार्फत शौचालय बनविण्यासाठी राजेशला पहिला हफ्ता मिळाला. नगरपालिकेने राजेशला सहा हजार रुपये दिले. मात्र, या पैशांचा उपयोग राजेशने शौचालय बनविण्यासाठी न करता चक्क स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी केला.
घरात शौचालय न बांधता राजेशने स्मार्टफोन खरेदी केल्याचं लक्ष्मीला कळालं. त्यानंतर ती चांगलीच संतापली आणि तीने घरात जेवण बनवणं सोडलं. तसेच राजेशसोबतही अबोला केला.
यानंतर राजेशने माघार घेतली आणि कर्ज काढून शौचालय बांधलं. मग, राजेश आणि लक्ष्मी यांच्यातील वाद संपला.
ज्यावेळी धनबाद नगरपालिकेच्या अधिका-यांना या घटनेसंदर्भात कळालं. त्यावेळी त्यांनी लक्ष्मीला आपलं ब्रँड अम्बेसेडर बनविण्याचं ठरवलं. त्यामुळे आता लक्ष्मी इतर महिलांनाही आपल्या घरात शौचालय बनविण्यासाठी प्रोत्साहीत करणार आहे.