नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला शाहीन बागेतील आंदोलन संपवण्यासाठी तासभराचा अवधीही लागणार नाही, असे वक्तव्य खासदार परवेश वर्मा यांनी केले. ते सोमवारी एका कार्यक्रमात बोलत होते. परवेश वर्मा हे पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. यावेळी त्यांनी म्हटले की, ११ फेब्रुवारीला दिल्लीत भाजपची सत्ता आल्यावर तुम्हाला शाहीन बागेत एकही व्यक्ती सापडणार नाही. एवढेच नव्हे तर दिल्लीत भाजपची सत्ता आल्यावर मी एका महिन्यात माझ्या मतदारसंघातील सरकारी जागांवर उभारण्यात आलेल्या मशिदी पाडून टाकेन, असेही शर्मा यांनी म्हटले. मी जे वक्तव्य केले. ते माघार घेण्यासाठी नाही, असेही वर्मा यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया म्हणतात आम्ही शाहीन बाग सोबत आहोत. परंतु, शाहीन बाग हे काश्मीर झाले आहे. काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे काश्मीर पंडितांच्या बहिणी, मुलींवर अत्याचार झाले. त्याचप्रमाणे दिल्लीत परिस्थिती उद्भवेल. 


भाजप सत्तेत आली नाही तर ते तुमच्या घरात घुसतील, तुमच्या मुली-बहिणींना उचलून नेतील, त्यांच्यावर बलात्कार करतील. त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. उद्या मोदी किंवा अमित शहा तुम्हाला वाचवायला येणार नाहीत, अशी भीतीही परवेश वर्मा यांनी व्यक्त केली. 



परवेश वर्मा यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस आणि 'आम आदमी पक्ष' (आप) आक्रमक होण्याची शक्यता आहे. कालच रिठाला विधानसभा मतदारसंघातील सभेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर एका वादग्रस्त घोषणेमुळे अडचणीत आले आहेत.


अनुराग ठाकूर यांनी भाषणादरम्यान 'देश के गद्दारो को' असे उच्चारताच जमावाने 'गोली मारो' अशा घोषणा दिल्या. व्यासपीठावरील एका नेत्यानेही हीच घोषणा दिली. मात्र, अनुराग ठाकूर यांनी लगेच त्या नेत्याला रोखले. मात्र, भाजपच्या नेत्यांना ठरवून जमावाकडून अशाप्रकारच्या घोषणा वदवून घेतल्याचा विरोधकांचा आरोप आहे.