Rahul Gandhi : काँग्रेस सरकार स्थापन करणार का? दमदार कामगिरीनंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया
Rahul Gandhi On loksabha Election result : इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर आता राहुल गांधी यांनी सरकार स्थापनेवर मोठं वक्तव्य केलं आहे.
Rahul Gandhi Press Conference : लोकसभा निवडणूक निकालांचा (Lok Sabha Election Result) सध्याचा कल पाहता इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसतंय. अनेक राज्यात इंडिया आघाडीने भाजपला टक्कर दिली अन् विजय मिळवला आहे. सध्या आलेल्या कल आणि निकालानुसार सत्ताधारी एनडीएला 300 च्या आत जागा मिळतील आणि भाजपला स्वबळावर सत्ता मिळणार नाही, असं चित्र सध्या तरी दिसतंय. सत्ताधारी एनडीएला 296 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीला जवळपास 228 जागांवर आघाडी मिळतेय. अशातच आता राहुल गांधी यांचं सध्या कौतूक होताना दिसतंय. त्यातच आता निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली.
काय म्हणाले राहुल गांधी?
आम्ही फक्त भाजपविरुद्ध लढलो नाही तर स्वतंत्र संस्थाविरोधी देखील लढलो, आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढतो. संविधान वाचण्यासाठी संपूर्ण जनता एकत्र आली. भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण केलं पण आम्ही एकत्र लढलो. मोदी आणि शहा यांनी यंत्रणांचा गैरवापर केला पण इंडिया आघाडीने देशाला नवा दृष्टीकोन दिलाय. मोदींचा पराभव म्हणजे अदानींचा पराभव. लोकशाही वाचवण्याचं काम देशातील सर्वात गरिब लोकांनी केलं आहे. लोकांनी या निकालामधून मोदी आणि शहा यांना संदेश दिला आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
सरकार स्थापन करणार का? असा सवाल जेव्हा राहुल गांधी यांना विचारला गेला तेव्हा आम्ही मित्रपक्षांशी चर्चा करून घेऊ. उद्या इंडिया आघाडीची बैठक आहे. त्यात जो निर्णय होईल, तसा निर्णय आम्ही घेऊ, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अदानींचे शेअर तुम्ही पाहिले? जनता मोदींचा थेट संबंध अदानींशी समजत आहे.. जनतेनंच मोदींना नाकारलं आहे. आम्ही ते ज्या पद्धतीनं देश चालवत आहेत त्याचं समर्थन करत नाही हेच जनतेनं पंतप्रधानांना दाखवून दिलं आहे आणि मला या जनतेचा प्रचंड अभिमान वाटतोय, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यावेळी राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेचं आणि प्रियांका गांधी यांचं कौतूक केलं.