बंगळुरु : काँग्रेसचे बडे नेते डी. के. शिवकुमार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. शिवकुमार हे कर्नाटकातले काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात ईडीचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. काल गुरूवारी हा युक्तीवाद पूर्ण झाला. त्यामुळे आज त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळणार की पुन्हा जेल होणार याची उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवकुमार यांनी इतकी माया जमवली कशी, हा ईडीचा सवाल आहे. जरी डी. के. शिवकुमार यांनी कर भरला असला तरी या खटल्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १९९७ ते २०१४ या काळातल्या तुलनेत शिवकुमारांची संपत्ती २०१४ ते २०१६ या दोन वर्षांतच तब्बल तिपटीने वाढल्याचे ईडीने म्हटले आहे.


शिवकुमार यांना १ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश देण्यात आला होता. त्याचवेळी न्यायालयाने शिवकुमारच्या प्रकृतीस प्रथम प्राधान्य दिले आणि रुग्णालयात हलविण्यास सांगितले. डॉक्टरांनी शिवकुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले तर त्यांना रुग्णालयात दाखल करावे आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यास तिहार तुरुंगात पाठवावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.


शिवकुमार २०१६ मधील नोटाबंदीनंतर आयकर विभाग आणि ईडीच्या रडारवर होते. २ ऑगस्ट २०१७ रोजी, आयकर विभागाने ८.५९ कोटी रुपयांच्या नवी दिल्लीतील त्यांच्या फ्लॅटमधील रोकड जप्त केली होती.