नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटकेपासून दूर राहण्यासाठी ते हरएक प्रयत्न करून पाहात आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं मंगळवारी त्यांची जामीन याचिका फेटाळलीय. दरम्यान, सीबीआयची टीम बुधवारी सकाळी पुन्हा एकदा चिदम्बरम यांच्या घरी दाखल झालीय. सीबीआयची एक टीम चिदम्बरम यांच्या जोरबागच्या घराच्या बाहेर हजर आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मंगळवारी रात्रीच्या सुमारास सीबीआय आणि ईडीचं पथक चिदम्बरम यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पोहचलं. मात्र चिदम्बरम घरी नसल्यामुळे तपास यंत्रणांना माघारी फिरावं लागलं. अखेर चिदम्बरम यांच्या घराबाहेर सीबीआयकडून रात्री ११.००  वाजता नोटीस लावण्यात आली असून दोन तासांत सीबीआयसमोर हजर राहण्याचं सांगण्यात आलं.



दरम्यान पी चिदम्बरम हे अजूनही सीबीआयसमोर हजर झालेले नाहीत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विशेष रजा याचिका दाखल करण्याची परवानगी दिली असून, सकाळी १०.३० वाजेपर्यंत चिदम्बरम यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची विनंती चिदम्बरम यांचे वकील अर्शदीप सिंग खुराना यांच्याकडून करण्यात आली आहे.


मंगळवारी, आयएनएक्स माध्यम प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने माजी चिदंबरम यांचे दोन्ही अंतरिम जामीन मंगळवारी फेटाळले. त्यामुळे चिदम्बरम यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज संपल्यामुळे त्यांना जामीन अर्ज दाखल करता आला नाही.